
फॅशन आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेप्रेमींना अभिमान वाटावा असा क्षण घेऊन आली आहे. तिचा पहिलाच इंग्रजी चित्रपट ‘Courage’ (करेज) याचे सँटो डोमिंगो, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये यशस्वी स्क्रिनिंग झाल्यानंतर आता या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग हॉलिवूडमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये पार पडले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण
‘करेज’ चित्रपटामधील तिच्या दमदार अभिनयाने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच चित्रपटाचे वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये स्क्रिनिंग होणं ही संस्कृतीसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे, जिनच्या चित्रपटाला वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये स्क्रिनिंगचा मान मिळाला आहे.
संस्कृतीचा मनोगत – एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं

स्वतःचा अनुभव शेअर करताना संस्कृती म्हणते, “करेज चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद शब्दांत मांडता येणारा नाही. पण वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये स्क्रिनिंग होणं, तिकडे जाणं, हा एक अविस्मरणीय क्षण होता. कधी वाटलंच नव्हतं की माझा चित्रपट तिथे दाखवला जाईल. तो क्षण माझ्यासाठी एक सोहळा ठरला. वॉर्नर ब्रदर्सच्या मोठ्या स्क्रीनवर ‘संस्कृती बालगुडे’ हे नाव दिसणं – हे केवळ गौरवाचं नव्हे तर माझ्यासाठी प्रेरणादायी होतं.“
मराठी कलाकृतीचा जागतिक पातळीवर सन्मान
आजवर संस्कृतीने अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे, पण ‘करेज’ या इंग्रजी चित्रपटाने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मराठी कलाकारांच्या कलाकृती जगाच्या पाठीवर पोहोचून तिथं कौतुकास पात्र ठरतात, याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘करेज’चं हे यश आहे.
आता नव्या प्रोजेक्ट्ससाठी उत्सुकता
‘करेज’ चित्रपटानंतर संस्कृती बालगुडे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तिचा अभिनय, तिचं आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि कलेप्रती असलेली निष्ठा पाहता, पुढील प्रवासही नक्कीच रोमांचक ठरणार आहे.
एक मराठमोळी अभिनेत्री आणि तिच्या आंतरराष्ट्रीय यशाची कहाणी – संस्कृती बालगुडेचा ‘करेज’ हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणार!
