
मराठी संस्कृती आणि भक्तीपरंपरेचा संगम साधणारा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअॅलिटी शो सोनी मराठीवर १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रस्तुत आणि गौरी थिएटर्स निर्मित या अनोख्या शोमध्ये भक्ती, ज्ञान आणि मनोरंजन यांची सुरेख सांगड पाहायला मिळणार आहे.
रिअॅलिटी शोमध्ये १०८ कीर्तनकारांचा सहभाग
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून १०८ निवडक कीर्तनकार सहभागी होणार आहेत. प्रत्येक भागात तीन कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने कीर्तन सेवा सादर करतील. ही संकल्पना प्रेक्षकांना पारंपरिक कीर्तनाच्या समृद्ध परंपरेचा अनुभव घरबसल्या देणार आहे.
दिग्गज कीर्तनकार परीक्षकांच्या भूमिकेत
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ह. भ. प. राधाताई सानप आणि ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील हे दोन प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक विषयांवर प्रभावी निरूपण करणाऱ्या या कीर्तनकारांकडून नवोदित कीर्तनकारांना मार्गदर्शन मिळणार आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय

राधाताई सानप स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर कीर्तनातून प्रभावी प्रबोधन करत असतात. जगन्नाथ महाराज पाटील यांचा ग्रामीण लहेजा, हजरजबाबीपणा आणि अभ्यासू शैली महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. दोघांचं मार्गदर्शन या शोमध्ये स्पर्धकांसाठी अमूल्य ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद
या रिअॅलिटी शोसाठी झालेल्या ऑडिशन्सना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नवोदित कीर्तनकारांना नवी दिशा मिळेल, तर प्रेक्षकांना कीर्तनाची मूलभूत माहिती, रस आणि अध्यात्माचा गोडवा अनुभवता येईल.
प्रत्येक घरात भक्तीचा नवा दीप पेटणार

या कार्यक्रमाच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी सुसंस्कार, आणि वयोवृद्धांसाठी भावस्पर्शी कीर्तन अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. केवळ एक स्पर्धा नसून हा एक संस्कृती संवर्धनाचा सुसंवादी प्रवास आहे.
विठ्ठलाच्या साक्षीने सुरु होणार अद्भुत शोधपर्व
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा भक्ती आणि प्रतिभेचा संगम असलेला रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर पाहायला विसरू नका!
