‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने नववर्षाचे अनोखे स्वागत

“सुशीला–सुजीत” या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नववर्षाच्या पूर्वपूर्व संध्येला पारंपरिक गुढी उभारून, मराठी चित्रपटसृष्टीला यश, भरभराट आणि नवनवीन प्रयोगांचे वर्ष लाभो अशी प्रार्थना केली.

चित्रपटाच्या यशासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या शुभेच्छा

राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी ‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट फक्त यशस्वी ठरावा एवढंच नाही तर इतरांना स्फूर्ती देणारा ठरावा, असेही ते म्हणाले.

स्नेहभोजनात सिनेसृष्टीतील आघाडीचे चेहरे सहभागी

या नववर्ष स्वागताचा आणि चित्रपटाच्या घोषणाचा सोहळा मंगळवारी सायंकाळी विलेपार्ले पूर्व येथील ‘अथर्व हाइट्स’ येथे स्नेहभोजनाच्या रूपात पार पडला. या सोहळ्यात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सुबोध भावे, रिंकू राजगुरू, आदिनाथ कोठारे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार सहभागी झाले.

गुढी उभारून नववर्षाचे स्वागत

मराठमोळ्या वेशभूषेत पारंपरिक सनई-तुतारी, ढोल-ताशा आणि समया पेटवून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. उत्साहाने भारलेले हे वातावरण प्रेक्षकांना आणि चाहत्यांना नव्या उमेदीनं नववर्ष सुरू करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरले.

प्रसाद ओकचा मजेशीर प्रश्न आणि शेलार यांचं रोचक उत्तर

कार्यक्रमादरम्यान प्रसाद ओक यांनी आशिष शेलार यांना चित्रपटाच्या कथानकाला अनुसरून मजेशीर प्रश्न विचारला – “तुम्हाला बंद दाराआड कोणासोबत अडकायला आवडेल?”
त्यावर शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मला राज ठाकरे यांच्यासोबत अडकायला आवडेल. कारण ते एक कलाकार आहेत, विचार करणारा माणूस आहे आणि त्यांच्यासोबत संवादात खरी मेजवानी मिळते.”

‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाची टीम आणि माहिती

‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ आणि ‘पंचशील एंटरटेन्मेंट्स’ प्रस्तुत ‘सुशीला–सुजीत’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय प्रसाद ओक यांनी केले आहे. स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी हे निर्माते असून, सुनील तावडे, रेणुका दफ्तरदार, सुनील गोडबोले हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

१८ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘सुशीला–सुजीत’

मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा, नववर्षाच्या उत्साहात रंगलेला आणि सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment