
‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ मधील बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सई ताम्हणकरची लावणीतून मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री
चित्रपटाच्या निर्मितीबाबतची आणखी एक खास बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या चित्रपटात पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसणार आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली अभिनयाची छाप सोडलेली सई या चित्रपटात लोककलेच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
एप्रिलमध्ये गाणं होणार प्रदर्शित
या चित्रपटातील लावणी एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईच्या चाहत्यांसाठी ही एक खास भेट ठरणार असून, मोठ्या पडद्यावर तिचं लावणी सादरीकरण पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरेल.

सई ताम्हणकरने व्यक्त केल्या भावना
या नव्या अनुभवाबाबत सई ताम्हणकर म्हणाली, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची संधी आणि ‘देवमाणूस’चा भाग होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्यांदाच कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे. प्रेक्षकांनी हे वेगळं रूप अनुभवावं यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे सादरीकरण त्यांच्यासाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे.”
चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित
‘लव फिल्म्स’ प्रस्तुत आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लोककलेचा शृंगार, दमदार अभिनय आणि नावाजलेली स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच एक विशेष अनुभव ठरणार आहे.
