‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटातील कलाकारांबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. अखेर या चित्रपटातील तिघा कलाकारांची नावं समोर आली आहेत – आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश). मात्र, चित्रपटातील आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

तिघेही कलाकार ओळखीचे, पण नव्या भूमिकेत

आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर यांनी याआधी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

  • आर्यन मेंगजी – ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, ‘बरोट हाऊस’, ‘डायबुक’, ‘बाबा’, ‘१५ ऑगस्ट’, ‘बालभारती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली असून, त्याला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात ‘बालभारती’ चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे.
  • श्रेयस थोरात – ‘सुखी माणसाचा सदरा’ या कलर्स मराठीवरील मालिकेत मोरूची भूमिका साकारली होती.
  • मंथन काणेकर – ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘योगयोगेश्वर जय शंकर’, ‘गाथा नवनाथांची’ या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांची प्रतिक्रिया

“‘एप्रिल मे ९९’साठी योग्य कलाकार निवडणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. अनेक ऑडिशन्स घेतल्यानंतर आम्ही आर्यन, श्रेयस आणि मंथन यांची निवड केली. आर्यनला मी आधी माधुरी दीक्षित यांच्या ‘१५ ऑगस्ट’साठी निवडलं होतं, तर श्रेयसची निवड मी रोहित शेट्टीच्या ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’साठी केली होती. सिद्धेशच्या भूमिकेसाठी अनेक पर्याय होते, मात्र त्याच्या वडिलांच्या पात्राशी मॅच होणाऱ्या कास्टिंगसाठी मंथनची निवड झाली. हे तिघेही त्यांच्या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत आणि प्रेक्षकांना त्यांचा अभिनय नक्कीच आवडेल.”

निर्माते राजेश मापुस्कर यांची भूमिका

“रोहन मापुस्कर इंडस्ट्रीत कास्टिंग डिरेक्टर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्याच्या चित्रपटात कोण झळकणार याची मलाही मोठी उत्सुकता होती. ‘एप्रिल मे ९९’ हा मैत्री आणि तारुण्याच्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट आहे. कलाकारांची योग्य निवड होणं आवश्यक होतं आणि ती अगदी योग्य प्रकारे झाली आहे. तिघा कलाकारांसोबत तीन महिन्यांचे वर्कशॉप घेतले गेले आणि आता त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून, संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असाच आहे.”

१६ मे रोजी प्रदर्शित होणार ‘एप्रिल मे ९९’

मापुस्कर ब्रदर्स, फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स यांच्या सहयोगाने बनलेल्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. निर्माते राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून आणि सहनिर्माते लॉरेन्स डिसोझा आहेत.

हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत तरुणाईसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

Leave a comment