
लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या नेहाने ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.
लेखन प्रवासाची सुरुवात
याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहासाठी ‘देवमाणूस’ हा मराठी सिनेसृष्टीत लेखिका म्हणून पदार्पण करणारा चित्रपट ठरणार आहे.
तगडी स्टारकास्ट आणि दमदार निर्मितीसंघ
तेजस देवस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.
लेखनाबाबत नेहा शितोळेची प्रतिक्रिया
“लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’ साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एका थरारक कथानकाला स्पर्श करतो आणि त्यात भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री म्हणून आतापर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, पण त्या लेखनात उतरवताना माझ्या आधीच्या अनुभवाची मदत झाली.”
नेहा पुढे सांगतात,
“‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देवस्कर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’ साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि समृद्ध करणारा ठरला. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”
२५ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘देवमाणूस’
लव फिल्म्स प्रस्तुत आणि तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
