
प्रेम आणि मैत्रीला वयाचं बंधन नाही
प्रेम, मैत्री आणि सहवास – या भावना कुठल्याही वयात जन्म घेतात आणि त्यांचा शोधही कुठल्याही टप्प्यावर सुरू होतो. याच नात्यांच्या गुंफणीतून निर्माण झालेली एक हळवी, खट्याळ आणि गोंडस गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे “अशी ही जमवा जमवी” या आगामी चित्रपटात. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचा मजेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अशोक सराफ – वंदना गुप्ते यांची धमाल जुगलबंदी
या चित्रपटात अनेक वर्षांनंतर दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. ट्रेलरमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या संवादातून आणि देहबोलीतून व्यक्त होणारा विनोद, आपुलकी आणि अवखळपणा ट्रेलरमध्येच झळकतो.
कौटुंबिक भावनिक कथानकाची एक नवी वाट
“अशी ही जमवा जमवी” केवळ एक प्रेमकथा नसून ती एक कौटुंबिक कथा आहे – जिथं नातेसंबंध कसे फुलतात, विश्वास कसा निर्माण होतो आणि वेगवेगळ्या वयोगटांतील पात्रांच्या भावना कशा गुंफल्या जातात, हे रंजकतेने मांडले आहे. कथा थोडी खट्याळ, थोडी हळवी आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी आहे.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
चित्रपटात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेसोबत ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर यांसारखे नामवंत आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. ही कथा वेगवेगळ्या वयोगटातील पात्रांची असल्याने त्यांच्यातील निरागसता, संभ्रम, विश्वास, गोंधळ आणि भावनिक गुंतवणूक या सर्व पैलूंना स्पर्श करणारी आहे.
राजकमल एंटरटेनमेंट – नव्या प्रवासाची सुरुवात
चित्रपती व्ही. शांताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव राहुल शांताराम यांनी ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नव्या निर्मितीसंस्थेची स्थापना करत नव्या दमाची निर्मिती सुरू केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते यांनी केलं आहे.
१० एप्रिल २०२५ – जमतायत नाती, जमतेय गोष्ट!
“अशी ही जमवा जमवी” हा सिनेमा येत्या १० एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, ट्रेलरमधूनच या सिनेमाच्या मजेशीर आणि भावनिक प्रवासाची झलक मिळते.
कथा नक्की कुठल्या वळणावर जाईल? अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पकडले जातील का? आणि ही जमवा जमवी नेमकी कशी होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिलची प्रतिक्षा करावी लागणार आहे!
