
सूरज चव्हाणच्या डान्सने पेटलाय मराठीचा डंका
‘बिग बॉस मराठी सिझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचं पहिले गाणं म्हणजेच ‘झापुक झुपूक’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. पार्टी साँग म्हणून गाजण्याची क्षमता असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
डीजे क्रेटेक्सच्या तालावर थिरकणारा मराठी बीट
या गाण्याचं संगीतकार आहेत मराठी हिप-हॉप क्षेत्रातील लोकप्रिय नाव – कृणाल घोरपडे उर्फ डीजे क्रेटेक्स. ‘तांबडी चामडी’नंतर त्यांनी पुन्हा एकदा ग्रूव्ही बीट्ससह रसिकांचं मन जिंकलं आहे. ‘पट्या द डॉक’ यांनी हे गाणं गायले असून, शब्द आहेत प्रतीक संजय बोरकर यांचे.
झापुक झुपूकमध्ये सूरज चव्हाणचा ढासू हूकस्टेप
गाण्यात सूरज चव्हाणने सादर केलेला हूकस्टेप सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. “पेटलाय मराठीचा डंका!” या ओळींमध्येच या गाण्याची ऊर्जा सामावलेली आहे. क्लब्स, पार्टीज आणि सोशल इव्हेंट्समध्ये हे गाणं ‘तांबडी चामडी’ प्रमाणेच धमाल उडवेल, याची खात्री डीजे क्रेटेक्सने व्यक्त केली आहे.
चित्रपटाच्या यशस्वी संगीत परंपरेत नवा अध्याय
केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटातील गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात ठसतात. ‘झापुक झुपूक’चं हे गाणंही त्याच परंपरेतले एक दमदार गाणं ठरत आहे. निर्माता ज्योती देशपांडे आणि सौ. बेला शिंदे यांच्या निर्मितीत साकारलेला हा सिनेमा संगीत, ऊर्जा आणि मनोरंजनाने परिपूर्ण आहे.
स्टारकास्टमध्ये सूरजसोबत झळकणार मराठीतील लोकप्रिय चेहरे
या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
२५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ चित्रपटगृहात
‘जिओ स्टुडिओज्’ प्रस्तुत आणि ‘केदार शिंदे प्रोडक्शन्स’ निर्मित हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच ‘झापुक झुपूक’ गाणं मराठी संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये हिट ठरलं आहे. ‘आता वाजतोय मराठी, गाजतोय मराठी!’ या घोषवाक्याशी सुसंगत अशी ही धमाल सुरू झाली आहे.
