झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं.

सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा

या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या शेअर केल्या. त्यांचं अनुभव ऐकून अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, “मी अनेकदा रात्रीच्या वेळीही मुंबईतील रिक्षांमधून प्रवास केला आहे आणि प्रत्येक वेळी सुरक्षित घरी पोहोचले आहे – ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
तुषार दळवींचा भावनिक अनुभव
श्रीनिवासची भूमिका साकारणारे तुषार दळवी म्हणाले, “आपल्या रिक्षाचालक बांधवांची कुटुंबासाठीची समर्पणभावना आणि त्यांचे संघर्ष खूप प्रेरणादायी आहेत. आज त्यांनी जे काही शेअर केलं, त्यामुळे आम्हाला परत जाणवलं की आम्ही ‘लक्ष्मी निवास’मध्ये अशाच लोकांच्या कथा सांगण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
१०० भागांचं केककटिंग आणि गोडसर भेट

सेटवर लक्ष्मी निवासचं संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं आणि रिक्षाचालक बांधवांसोबत केक कापून १०० भागांचं यश साजरं केलं. याच सेलिब्रेशननिमित्त झी मराठी आणि लक्ष्मी निवास कुटुंबाकडून आंब्यांची पेटी भेट स्वरूपात देण्यात आली.
मालिकेच्या कथेला लाभलेली वास्तवाची प्रेरणा

सध्याच्या कथानकात श्रीनिवास एका रिक्षाचालकाच्या भूमिकेतून घरासाठीचा संघर्ष करताना दिसतो. हेच वास्तवात अनेक रिक्षाचालकांचं जीवन आहे. ही सत्यकथा मालिकेतून उलगडणं आणि त्या प्रेरणास्थानांशी प्रत्यक्ष भेट होणं हेच या सेलिब्रेशनचं खऱ्या अर्थाने यश ठरलं.

पाहायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर!
