
प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली असून, येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक हलकाफुलका, गोडसर आणि भावनिक प्रवास ठरणार आहे.
भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला कलाकारांची हटके एन्ट्री
ट्रेलर लॉन्च सोहळ्याला चित्रपटातील प्रमुख पात्रांनी रंगतदार एन्ट्री घेतली. सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर तर ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर धमाकेदार प्रवेश केला. ‘चल जाऊ डेटवर’ या धमाल गाण्यावर कलाकारांनी थिरकून वातावरणात उत्साहाची लहर निर्माण केली. पुष्पवृष्टीने स्वागत झालेल्या या क्षणांनी रसिकांना ट्रेलरचा गोडवा अनुभवायला लावला.
प्रेमाचं नव्याने उलगडणारं नातं
चित्रपटाची कथा दोन कुटुंबांभोवती फिरते – ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नाच्या निमित्ताने ही कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत एक वेगळंच नातं फुलतं, जे प्रेमाच्या वयाला बंधन नसतं याचं प्रत्यंतर देतं. ट्रेलरमधील “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” हा संवाद सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.
नात्यांचा गोडवा आणि गोंधळ यांचा सुरेख मेळ
‘गुलकंद’ हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, त्यात भावना, हास्य, गोंधळ आणि प्रेम यांचा उत्तम समतोल साधण्यात आला आहे. ढवळे आणि माने कुटुंबांच्या नात्यांमधून उभा राहणारा गोंधळ आणि त्या गोंधळातला गोडवा – हाच या चित्रपटाचा खरा गुलकंद ठरणार आहे.
दमदार कलाकारांचा संगम

चित्रपटात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे, तसेच वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथेला खमकी झळाळी दिली आहे.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे विचार
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यात गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं. ‘गुलकंद’मध्ये तो गोडवा आहे. विनोदासोबत भावना आणि नात्यांचं खूप सुंदर मिश्रण यात पाहायला मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “गुलकंद हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहावा असा हा चित्रपट आहे. दर्जेदार विनोद, हृदयस्पर्शी भावना आणि गोड नात्यांची गुंफण यात आहे.”
प्रेक्षकांसाठी खास भेट ठरणार ‘गुलकंद’
‘गुलकंद’ चित्रपटातून प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रेमकथेचा अनुभव मिळणार आहे – जी वय, वेळ आणि परिस्थितीच्या चौकटीत न अडकता मनाच्या गाभ्यात पोहोचते. १ मे २०२५ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक गुलकंदासारखा गोड अनुभव देणार आहे.
