
‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, ‘अल्याड पल्याड’ आणि ‘लंडन मिसळ’ या कलाकृतींतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर ‘येड लागलं प्रेमाच’ आणि ‘शिट्टी वाजली रे’ या दोन नव्या शोचे प्रोमो शेअर करत तिने एकाचवेळी दोन मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे.
“छप्पर फाडके मिळालंय प्रेम आणि काम” – माधुरी पवार

माधुरी आपल्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल म्हणते, “देणेवाला जब भी देता… देता छप्पर फाडके! अशी माझी सध्याची भावना आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी सिरियल्सपासून दूर होते, कारण काही चित्रपट आणि वेबसीरिज करत होते. मात्र मालिकांसोबतचं माझं नातं खूप जवळचं आहे.”
‘येड लागलं प्रेमाच’ मध्ये निगेटिव्ह भूमिकेत
स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाच’ या मालिकेत माधुरी निकी नावाची बिनधास्त, नीडर आणि रावडी अशी नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन आणि धाडसी रूप घेऊन येणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ मध्ये धमाल मस्ती

दुसऱ्या बाजूला, ‘शिट्टी वाजली रे’ या नव्या रिअॅलिटी शोमध्ये माधुरी धमाल आणि मस्ती करताना झळकणार आहे. नृत्यकलेत पारंगत असलेल्या माधुरीसाठी हा शो तिच्या एनर्जीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा नवा अविष्कार ठरणार आहे.
“प्रेक्षकांचं प्रेम माझ्यासाठी सर्वस्व”
माधुरी म्हणते, “मी दोन्ही शोज एकाचवेळी करत आहे आणि प्रेक्षकांना माझ्या या वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मजा येईल. मला विश्वास आहे की तुमचं प्रेम कायम असंच राहील.”
नव्या भूमिकांसह माधुरी पुन्हा सज्ज
माधुरी पवारचा छोट्या पडद्यावरचा हा नवा प्रवास मालिकांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकाचवेळी नेगेटिव्ह भूमिकेतील ताकद आणि रिअॅलिटी शोमधील धमाल, अशा दोन वेगवेगळ्या पैलूंनी प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा तिचं स्थान मजबूत होणार आहे.
