
सध्या प्रचंड उकाडा असतानाच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना एक गोड, थोडा खट्याळ आणि अत्यंत नॉस्टॅल्जिक वळण देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मस्तीने भरलेला टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची धमाल मस्ती प्रेक्षकांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत आहे.
स्मार्टफोन आणि वायफायपूर्व काळातली सुट्टी
आजच्या इंटरनेट युगात सुट्टी म्हणजे मोबाइल, गेम्स आणि सोशल मीडियावर मर्यादित अनुभव. पण ‘एप्रिल मे ९९’ आपल्याला घेऊन जातंय त्या काळात, जेव्हा ना स्मार्टफोन होते ना वायफाय. तेव्हा सुट्टीचा अर्थ होता – गावाकडे जायचं, सायकलवर भटकायचं, नदीकाठी डुंबायचं, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायचं आणि बर्फाचे गोळे खायचे. हीच मजा या टिझरमध्ये अनुभवायला मिळतेय.
जाई कोण आहे? प्रेक्षकांत उत्सुकता वाढवणारा प्रश्न
चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश गावभर कल्ला करत फिरताना दिसतात. त्यांचे प्लॅन्स सुरू असतानाच ‘जाई’ नावाच्या एका पात्राच्या आगमनाची चाहूल लागते. आता ही जाई नेमकी कोण आहे? आणि ती या तिघांच्या सुट्टीत काय वळण आणणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांची बालपणाच्या अनुभवांवर आधारित कहाणी
दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून प्रेक्षकांना जुन्या सुट्ट्यांची सफर घडेल. परीक्षा संपल्यानंतरचा तो आनंदाचा काळ – प्रत्येकाने अनुभवलेला – पुन्हा जिवंत करायचा आमचा प्रयत्न आहे.”
राजेश मापुस्कर यांचं निर्मितीविषयी मत
चित्रपटाचे निर्माता राजेश मापुस्कर म्हणतात, “या तिघांची मैत्री आणि त्यांचा खट्याळपणा प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या मित्रांची आठवण करून देईल. आजच्या सिमेंटच्या जंगलात, तंत्रज्ञानाच्या गर्दीत खऱ्या सुट्ट्यांचा आनंद हरवला आहे, तोच परत देणं हे ‘एप्रिल मे ९९’चं ध्येय आहे.”
चित्रपटाची टीम आणि प्रदर्शन
मापुस्कर ब्रदर्स, फिंगरप्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बनलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) या नवोदित कलाकारांनी बालमैत्रीची मजा उत्तमरित्या साकारली आहे.
यंदाची उन्हाळ्याची सुट्टी ठरणार आहे कुल आणि नॉस्टॅल्जियाने भरलेली – ‘एप्रिल मे ९९’ सोबत!
