
सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून पार पडला भक्तिभाव, संस्कृती आणि सामाजिक योगदानाचा अद्वितीय संगम
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शेलार मामा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी असलेले अभिनेता सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून कुलस्वामिनी श्री. भैरी भवानी चैत्र नवरात्रौत्सव ३० मार्च ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत लोअर परळ, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
नवचंडी यज्ञ व कलाकारांचा सहभाग
या नऊ दिवसांच्या उत्सवात सकाळी नवचंडी यज्ञ तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यज्ञाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून पूर्णाहुतीपर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभागी होऊन देवीची उपासना केली. प्राणप्रतिष्ठा सुशांत शेलार आणि भार्गवी चिरमुले यांनी सपत्नीक केली. उर्वरित आठ दिवसांत मानसी साळवी, अभिजित व सुखदा खांडकेकर, अर्चना नेवरेकर, प्रसाद व मंजिरी ओक, स्वप्नील व लीना जोशी, रुपाली भोसले, अंकिता वालावलकर, दिव्या पुगावकर आणि हर्षदा खानविलकर यांच्या हस्ते यज्ञ पार पडला.

राजकीय व प्रशासकीय मान्यवरांची उपस्थिती
या उत्सवाला अनेक मान्यवरांनी मनोभावे हजेरी लावली. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे, कला शिंदे, संजय मोरे, राहुल शेवाळे, अभिजित अडसूळ, सुनील शिंदे, तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनशिवे हेही या भक्तिमय वातावरणाचा भाग झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची झलक

सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने दररोज संध्याकाळी नवरात्रीस प्रेरणा देणारे संगीत, नृत्य आणि भक्तिपर कार्यक्रम झाले. मयूर सुकाळे, पद्मनाभ गायकवाड, स्वप्नील गोडबोले, आदिश तेलंग आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्यासह ‘दि वुमनियाझ’ या बँडने रसिकांची मने जिंकली. देवीचा गोंधळ, कन्यापूजन, कुंकुमार्चन, महिलांसाठी क्रीडा स्पर्धा, होम मिनिस्टर हे कार्यक्रम विशेष उत्साहात पार पडले.
नृत्य महोत्सव व शक्तिरंग
देवेंद्र शेलार यांच्या परीक्षणाखाली नृत्य स्पर्धा पार पडली. कलार्पण अकादमीच्या ‘शक्तिरंग’ या विशेष नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटच्या दिवशी भव्य रास गरबा आयोजित करण्यात आला, ज्यात सहभागी झालेल्या गरबा प्रेमींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
आरोग्य शिबिर व सोशल मीडिया स्पर्धा

शेलार मामा फाउंडेशन आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, फोटोग्राफी, व्हिडिओ आणि रील्स स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्हे देण्यात आली.
शेवटी एक सुसंस्कृत, भक्तिपूर्ण आणि लोकसहभागाने परिपूर्ण सोहळा
या नवरात्रौत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विकास खरगे (अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग) आणि विभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय) यांच्या सहकार्याबद्दल शेलार मामा फाउंडेशनने मनापासून आभार व्यक्त केले. हवन, सांस्कृतिक उत्सव, मान्यवरांची उपस्थिती आणि भाविकांची श्रद्धा या सर्वांनी मिळून २०२५ चा चैत्र नवरात्रोत्सव एक अविस्मरणीय सोहळा ठरवला.
