चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा सोहळा – चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार यंदा आपल्या २७व्या वर्षात पदार्पण करतो आहे. हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार आहे.

कला, नाट्य, चित्रपट आणि समाजसेवेचा संगम

सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि संस्थांना गौरवण्यासाठी चंद्रशेखर सांडवे यांनी २७ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आज वटवृक्षासारखी बहरलेली आहे. हजारो कलावंतांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचं हे व्यासपीठ रसिकांमध्ये विशेष स्थान राखून आहे.

चार विभागातील नामांकने जाहीर

या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट आणि पत्रकारिता या चार विभागांतून नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांपासून नवोदितांपर्यंत सर्वांची छाननी सन्माननीय परीक्षक समितींनी रसिक प्रेक्षकांच्या सहभागासह केली आहे.

कलाक्षेत्रातील ज्येष्ठांना सन्मान

या वर्षीचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना देण्यात येणार असून, हा निर्णय समितीने एकमताने घेतला आहे.

विशेष विभाग – पत्रकारिता आणि सामाजिक भान

पत्रकारिता विभागात विविध वृत्तवाहिन्यांसोबत उत्कृष्ट पत्रकार, निवेदक आणि रिपोर्टर यांची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. छबीला, मोऱ्या आणि मंगला या चित्रपटांना विशेष सामाजिक चित्रपट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

प्रेक्षकांचा सहभाग, पारदर्शक प्रक्रिया

सर्व विभागातील नामांकने परीक्षक समितीच्या परीक्षणासह रसिक प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतांवर आधारित जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याची पारदर्शकता आणि लोकसहभाग टिकून आहे.

सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यातील कला, नाट्य, चित्रपट, साहित्य आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन, संगीत आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील सर्वोत्तम कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर सांडवे यांचे आवाहन

८ मे २०२५, रवींद्र नाट्यमंदिर – हा दिवस ठेवा लक्षात, कारण कला, अभिव्यक्ती आणि गौरवाचा एक महत्त्वपूर्ण क्षण तिथं उभा आहे.

या पुरस्कार सोहळ्याची यावर्षीची भव्यता अधिक मोठी आणि संस्मरणीय असणार आहे. “हा पुरस्कार सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी प्रत्येक रसिकाने घ्यावी,” असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे.

Leave a comment