
प्रशांत साजणीकर यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने नियुक्ती केली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सामान्य प्रशासन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत होते.
प्रशासन, कायदे आणि धोरणनिर्मितीचा प्रदीर्घ अनुभव
साजणीकर यांना प्रशासनाचा सखोल अभ्यास असून, ‘महाराष्ट्र लोकायुक्त कायदा २०२४’ आणि ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा २०२४’ तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गट क श्रेणीतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षांचे धोरण ठरवणे, तसेच लिपिक संवर्गाच्या परीक्षा आयोगाकडे वर्ग करण्याचा निर्णय यामध्येही त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. विभागीय चौकशीसाठी डी-पोर्टल तयार करण्यामध्येही त्यांनी मोलाचा सहभाग दिला आहे.

प्रशासकीय अनुभवाचे व्यापक क्षेत्र
त्यांनी जलसंपदा विभागात उपसचिव, सार्वजनिक बांधकाम विभागात अव्वरसचिव, तसेच २००६ ते २०१४ या काळात उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. उपसचिव व वरिष्ठ पदांच्या पदोन्नती समितीचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
सांस्कृतिक संवेदनशीलतेचा वारसा
साजणीकर यांना संत साहित्याचा विशेष अभ्यास असून, त्यांनी प्रवास, चित्रपट, साहित्य यांसारख्या विषयांवर विपुल लेखन केलं आहे. त्यांचे लेख वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर लोकप्रिय ठरले आहेत. त्यांना वाचन, पर्यटन, छायाचित्रण यांची आवड असून, बासरी वादनाचा छंद ते जोपासतात.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतून उपक्रमशीलतेला चालना
नव्या भूमिकेत ते चित्रपटप्रेमी प्रेक्षक घडवण्यासाठी विविध कार्यशाळा, उपक्रम आणि अभियान राबविण्याचा मनोदय व्यक्त करतात. मराठी चित्रपटांकडे वळणाऱ्या नव्या कलाकारांसाठी विशेष योजना राबवण्याचं ते उद्दिष्ट ठेवत आहेत. तसेच, महामंडळाच्या व्यावसायिक वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
साजणीकर यांच्या प्रशासकीय कौशल्य आणि सांस्कृतिक जाणिवांचा मिलाफ महामंडळासाठी एक नवीन ऊर्जा आणि दिशा निर्माण करणारा ठरणार आहे.
