
खऱ्या फॅक्टरीतलं कथानक, खरी माणसं आणि माणुसकीचा ठसा
‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यशस्वी परंपरेत आता ‘हुकुमाची राणी ही’ ही नवी मालिका २१ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण मुंबईतील नव्हे तर थेट साताऱ्यातील खऱ्या फॅक्टरीत होत आहे. मालिकेच्या पत्रकार परिषदेसाठीही फॅक्टरीचंच ठिकाण निवडण्यात आलं आणि पत्रकारांनाही कामगारांच्या वेशात फॅक्टरीच्या दिवसाचा अनुभव देण्यात आला.
वैभवी चव्हाण आणि अक्षय पाटील मुख्य भूमिकेत
या मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ‘राणी’ची भूमिका साकारत आहे, तर ‘इंद्रजीत’च्या भूमिकेत अक्षय पाटील झळकणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल मेहंदळे जयसिंगराव महाडिक या प्रभावशाली भूमिकेत दिसणार आहेत. महाडिक इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा जयसिंगराव आपल्या नंतरचा कारभार आपल्या मुलाकडे सुपूर्त करतात आणि याच निर्णयामुळे राणी महाडिक इंडस्ट्रीमध्ये येते. पुढे माणुसकीची किंमत ओळखणारी राणी आणि पैशाला सर्वस्व मानणारा इंद्रजीत यांच्यात संघर्ष उभा राहतो.
खऱ्या अनुभवातून साकारलेली गोष्ट
या मालिकेची निर्माती श्वेता शिंदे म्हणाल्या की, “पहिल्यांदाच एका खरीखुऱ्या फॅक्टरीमध्ये चित्रीकरण करत आहोत. यामागे माझ्या आईची फॅक्टरी ही खरी प्रेरणा आहे. जशी महाडिक इंडस्ट्रीत राणी आहे, तशीच एक राणी माझ्या फॅक्टरीत होती. तिच्याकडून प्रेरणा घेत ही गोष्ट लिहिण्यात आली आहे. ही मालिका केवळ मनोरंजन देणार नाही, तर माणुसकी जपण्याचा संदेश देईल.”
मालिकेची मातीशी नाळ आणि वास्तवाशी जोड
‘हुकुमाची राणी ही’ ही मालिका केवळ प्रेमकथा किंवा औद्योगिक सत्तासंघर्ष दाखवणारी मालिका नसून ती माणसांमधल्या मूल्यांचं प्रतिबिंब ठरणार आहे. सत्य घटनांवर आधारित सादरीकरण, थेट फॅक्टरीचं वातावरण आणि मजबूत कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करेल, यात शंका नाही.
प्रेक्षकांनी प्रोमोवर जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम आता मालिकेलाही मिळेल, अशी निर्मात्यांना आशा आहे.
पाहा ‘हुकुमाची राणी ही’ – २१ एप्रिलपासून दररोज सायं. ७ वाजता फक्त ‘सन मराठी’वर.
