‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या खट्याळ तिघांच्या मैत्रीत आता एक नवीन मैत्रीण जाईची भर पडली आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये सतत दिसणारा पाठमोरा चेहरा कोणी असेल, याबाबतची उत्कंठा अखेर संपली आहे. ही व्यक्तिरेखा साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची कन्या आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून साजिरी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत असून तिची ‘जाई’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण करेल, असा विश्वास दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.

निरागस, खट्याळ आणि दिलखुलास ‘जाई’
जाई ही हुशार, गोड, समजूतदार मुलगी असून ती कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप मजा करताना दिसणार आहे. तिच्या एन्ट्रीनं कथेला एक नवं वळण मिळणार असून ही गँग आता अधिक धम्माल करणार, हे निश्चित.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांची कल्पक निवड
“साजिरीचं निरागस हास्य, बोलके डोळे आणि अभिनयातील सहजता लक्षात घेऊन मी तिच्यासाठीच ‘जाई’ ही व्यक्तिरेखा लिहिली,” असं सांगत दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांनी तिच्या निवडीमागचं कारण स्पष्ट केलं.

निर्माते राजेश मापुस्कर यांचं मत
“’एप्रिल मे ९९’ हा चित्रपट सगळ्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारा आहे. या अनुभवासाठी आम्हाला तितक्याच निरागस चेहऱ्यांची गरज होती. साजिरीचं हास्य आणि सहज अभिनय या चित्रपटाला फ्रेशनेस देतात,” असं त्यांनी नमूद केलं.

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाची टीम आणि प्रदर्शन
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं आहे. निर्मात्यांमध्ये राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून आणि लॉरेन्स डिसोझा यांचा समावेश आहे.

हा चित्रपट येत्या १६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काळातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा पुन्हा अनुभवण्यासाठी ‘एप्रिल मे ९९’ नक्की पाहा!

Leave a comment