
देवभूमी कोकणात सुरू होणार मालिकेचं शूटिंग
मालिकेची कथा कोकणात घडत असल्यामुळे मालिकेचा श्रीगणेशा आणि लॉन्चिंग सोहळा देखील याच भूमीत करण्यात आला. या कार्यक्रमाला सुकन्या कुलकर्णी, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, अमृता माळवदकर, अमित खेडेकर, संजय शेजवळ आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते.
गिरीजा प्रभूचा लाठीकाठीचा खेळ ठरला आकर्षण
लक्ष्मीनारायण मंदिरात आशीर्वाद घेऊन या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कोकणातील पारंपरिक दशावतार सादर करून कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या सोहळ्यात अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने सादर केलेला लाठीकाठीचा खेळ प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून गेला.
दशावताराचा खेळ आणि गाऱ्हाणं घालून मालिकेचा शुभारंभ

‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…’ असं गाऱ्हाणं वैभव मांगले यांनी सादर करताच संपूर्ण वालावल नगरी नादमय झाली. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेचा लॉन्च सोहळा नुकताच कोकणात पार पडला. मालिकेचं बरंचसं शूटिंग कोकणातल्या कुडाळमध्ये होणार असून वालावल मंदिर, निवतीचा समुद्रकिनारा यांसारखी निसर्गसंपन्न स्थळं मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
सुकन्या कुलकर्णींची भूमिका आणि कोकणाशी असलेलं नातं

सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, “३००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहून आम्हाला भरभरून प्रेम दिलं. कोकणातली माणसं फणसासारखी असतात — वरून काटेरी पण आतून गोड. माझी ‘सुलक्षणा धर्माधिकारी’ ही भूमिका अगदी अशीच आहे, जी प्रेक्षकांनी याआधी पाहिलेली नाही.”
प्रत्येक कलाकाराची नाळ कोकणाशी जोडलेली
या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कोकणाशी नातं आहे आणि त्यामुळे या कथानकात एक विशिष्ट सजीवता जाणवते. ही नवी मालिका सोमवार २८ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेतून कोकणातील माणुसकी, संघर्ष आणि नात्यांची गुंफण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
