के. एस. चित्रा यांच्या आवाजातलं पहिलं मराठी गाणं  ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ प्रदर्शित

पद्माराज राजगोपाल नायर लिखित व दिग्दर्शित ‘माझी प्रारतना’ या मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांमध्ये या गीताने उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार पद्माराज नायर आणि अनुषा अडेप यांच्यात खुलत जाणाऱ्या नाजूक प्रेमभावना या गाण्यातून खास रेखाटण्यात आल्या आहेत. शेताच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेलं हे गीत दृश्य आणि संगीत अशा दोन्ही पातळ्यांवर प्रेक्षकांना भावतंय.

के. एस. चित्रा यांचा मराठी गाण्यात पदार्पणाचा भावनिक क्षण

भारतीय संगीतक्षेत्रातील ‘नाईटिंगेल ऑफ साऊथ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. एस. चित्रा यांनी या चित्रपटाद्वारे आपल्या मराठी गायन कारकीर्दीची सुरुवात केली आहे. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि भावनिक सादरीकरणामुळे हे गीत अधिकच हृदयस्पर्शी ठरतंय. चित्रा यांनी सांगितलं की, “मराठी गाणं गाणं हे माझ्यासाठी एक नवा अनुभव होता, पण पद्माराज यांचं मार्गदर्शन आणि गीतातील भावनिक ओघामुळे मी ते सहज गाऊ शकले.”

संगीत, शब्द आणि भावनांची त्रिसुत्री

या गीताचं संगीत विश्वजित सी. टी. यांनी दिलं असून, गीतकार म्हणून पद्माराज नायर यांनीच शब्द रचले आहेत. गाण्यातील सूर आणि शब्द प्रेमाच्या बंधांची सुरेख गुंफण करताना जाणवतात. हे गाणं केवळ एक गाणं न राहता, चित्रपटातील प्रेमकथेचा एक महत्त्वाचा भाग ठरतंय.

९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘माझी प्रारतना’

ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘माझी प्रारतना’ ही संगीतप्रधान प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. पद्माराज नायर आणि अनुषा अडेप यांच्यासोबत इतर अनेक मराठी कलाकारही यात झळकणार आहेत. एस.आर.एम. फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित आणि विश्वजित सी. टी. संगीतबद्ध, हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांनी हे रोमँटिक आणि भावनिक गाणं अनुभवण्यासाठी YouTube वर ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता – माझी प्रारतना’ शोधायला विसरू नये.

Leave a comment