
प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग
‘अशी ही जमवा जमवी’ या कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावस्पर्शी कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला भव्य सोहळा
या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं, ज्यात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आ. आशिष शेलार यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळा संवाद साधला. याशिवाय ज्येष्ठ निर्माता किरण शांताराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
चित्रपटाच्या टीमला मिळाल्या सेलिब्रिटींच्या शुभेच्छा
या विशेष प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर, सचिन पिळगांवकर, भरत जाधव, सुनील बर्वे, ओमकार कुलकर्णी, चैत्राली गुप्ते, तनिष्का विशे आणि संगीतकार अमितराज यांनीही उपस्थिती लावली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे स्क्रिनिंगचे वातावरण उत्साही आणि आनंददायक झाले.
पहिल्या निर्मितीतून भावनिक आणि मनोरंजक सादरीकरण
‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला असून व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांची ही पहिली निर्मिती आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात उबदार जागा मिळवली असून, कौटुंबिक चित्रपटप्रेमींना भावणारी ही कलाकृती ठरली आहे.
