‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री

नवीन ट्विस्टसह मोहिनीचं आगमन
‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आदिशक्ती’ सध्या अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. शिवा आणि शक्तीने मिळून भद्रा आणि प्रिन्सचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर उघड केला आहे. यानंतर मालिकेत एक नवे पात्र – मोहिनी – एन्ट्री घेणार असून ही भूमिका अभिनेत्री अक्षया गुरव साकारत आहे. मोहिनीचं आगमन शिवा आणि शक्तीच्या नात्यात दुरावा आणणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे.

अक्षया गुरवची भूमिकेसंदर्भातील प्रतिक्रिया
अभिनेत्री अक्षया गुरव म्हणाली, “पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येत असल्याचा मला आनंद आहे. ‘आदिशक्ती’मध्ये ‘मोहिनी’ ही खास भूमिका साकारत आहे. चॅनेल आणि प्रॉडक्शन टीमने माझी दखल घेतल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मोहिनी ही भूमिका सोज्वळ आहे की ग्रे शेड्स असलेली, हे मी उघडपणे सांगणार नाही. मात्र प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा निश्चितच आवडेल, याची मला खात्री आहे.”

ग्लॅमरस लूकमधील ‘मोहिनी’

पूर्वी प्रेक्षकांनी अक्षयाला सोज्वळ भूमिकांमध्ये पाहिलं आहे. मात्र यावेळी ती ग्लॅमरस लूकमध्ये मोहिनी साकारणार आहे. ती म्हणाली, “फिटनेस आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळेच मी ही भूमिका साकारू शकते आहे. मोहिनीच्या रूपात एक वेगळं आणि आकर्षक रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे.”

नवा ट्विस्ट पाहण्यासाठी सज्ज व्हा
‘आदिशक्ती’मध्ये मोहिनी कोणता नवा वळण आणणार, हे पाहणं रंजक ठरेल. त्यामुळे दररोज रात्री ९ वाजता ‘सन मराठी’वर ही मालिका पाहायला विसरू नका.

Leave a comment