
शासनाकडून बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोंडी-अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटास अधिकृत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे सिनेमामाध्यमातून सादरीकरण होणार आहे.
चित्रपट निर्मितीची जबाबदारी सांस्कृतिक महामंडळाकडे
या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. व्यावसायिक दर्जाच्या निर्मितीसाठी संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाणार आहे. तसेच छाननी समिती व निवड समितीच्या माध्यमातून दिग्दर्शक अथवा निर्मितीसंस्थेची निवड करण्यात येईल.
अहिल्यादेवींचे शौर्य आणि कर्तृत्व आधुनिक महाराष्ट्रासाठी प्रेरणा
अहिल्यादेवी होळकर यांचे संपूर्ण आयुष्य हे धैर्य, सामाजिक बांधिलकी आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक आहे. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्या आजही आदर्श नेतृत्वाचा प्रत्यय देतात. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा व्यापक प्रचार होणार असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला अधिक गती मिळणार आहे.
त्रिशताब्दीनिमित्त ऐतिहासिक घोषणा
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त चौंडी येथून शासनाने ही ऐतिहासिक घोषणा केली. हा केवळ जीवनपट न राहता त्यांच्या कार्याची सखोल मांडणी करणारा चित्रपट असेल, असे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक पर्व
या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये एक प्रेरणादायी कथा देशभर पोहोचणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीत एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, यात शंका नाही.
