
अनोख्या शीर्षकाने आणि आशयघनतेने लक्ष वेधणाऱ्या ‘अष्टपदी’ या मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आता संपणार आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशन निर्मित हा सिनेमा ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन आणि लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यावर लग्नाच्या पार्श्वभूमीत प्रमुख व सहाय्यक कलाकार झळकत आहेत.
दिग्दर्शक-निर्माता उत्कर्ष जैन यांचा नावीन्यपूर्ण प्रयोग
या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्कर्ष जैन यांनी केले असून, निर्माते म्हणून त्यांनी महेंद्र पाटील यांच्यासह जबाबदारी पार पाडली आहे. कथानक, पटकथा आणि संवादलेखन महेंद्र पाटील यांचे असून, ते या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शकही आहेत. पोस्टरमधून ‘अष्टपदी’ हा शब्द आणि लग्नमंडपाची पार्श्वभूमी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे – सप्तपदी माहिती आहे, पण अष्टपदी म्हणजे नेमके काय?
लग्नसंस्थेच्या पलीकडचा विचार…
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील बंध नव्हे, तर दोन कुटुंबांच्या भावना, अपेक्षा आणि जिव्हाळ्याचा प्रवास. ‘अष्टपदी’ हा चित्रपट भारतीय विवाहसंस्थेवर नव्याने भाष्य करतो की आणखी काही सांगतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. उत्कर्ष जैन यांनी सांगितले की, “या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांची गुंफण आणि सामाजिक वास्तव यांचा नवा पैलू अनुभवता येईल.”
संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणेची नव्या जोडीतील केमिस्ट्री
या चित्रपटात संतोष जुवेकर एका वेगळ्या रूपात दिसणार असून, मयुरी कापडणेसोबत त्यांची केमिस्ट्री विशेष लक्ष वेधणार आहे. सोबत अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, विनिता काळे, उत्कर्ष जैन यांच्यासह अनेक कलाकार सज्ज आहेत.
संगीत आणि तांत्रिक बाजूने भक्कम निर्मिती
सिंधुताई सपकाळ, दिल मांगे मोअर, दिल विल प्यार व्यार, स्टोरी टेलर, फुले अशा अनेक चित्रपटात मोलाची कामगिरी बजावणारे नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून त्यांच्या सोबत राहुल पाटील कार्यरत आहेत. चित्रपटातील गाणी गणेश चेउलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिली असून, संगीत मिलिंद मोरे यांचे आहे. छायांकन धनराज वाघ, कला दिग्दर्शन निलेश रसाळ, रंगभूषा अतुल शिधये, वेशभूषा अंजली खोब्रेकर आणि स्वप्ना राऊत यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन दिग्विजय जोशी यांचे आहे.
अष्टपदी — एक विचारप्रवृत्त करणारा अनुभव
‘अष्टपदी’ हा चित्रपट नात्यांच्या अनोख्या गाठी, सामाजिक वास्तव आणि वैवाहिक संस्कृतीच्या सूक्ष्म पैलूंवर भाष्य करणारा ठरणार आहे. ३० मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय – तोपर्यंत अष्टपदीचा अर्थ आणि त्यामागचा आशय काय असावा, यावर चर्चा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही!
