
शाळा, कथक, झोप आणि स्वयंपाक – सुट्टीच्या खास आठवणी
‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या बालपणीच्या उन्हाळा सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सांगते की तिच्या सुट्ट्या फारशा गावी जात नसत, पण घरात आणि बिल्डिंगमध्येच खूप मजा असायची. सकाळच्या शाळेमुळे बाबा तिला लवकर उठायची सवय लावायचे आणि त्यामुळेच सुट्टीतही तिला लवकर उठून देवाची पूजा आणि पाढे म्हणायचे आवडायचं.
भातुकली, चुरमुरे आणि पाढ्यांचं बाळकडू

स्वाती सांगते की तिच्या मैत्रिणी खूप कमी होत्या – फक्त सोनाली खरे आणि केतकी सुतावणे. त्या सुट्टीत गावी निघून जात असल्याने स्वाती स्वतःशीच खेळायची. भातुकलीचा खेळ, आईचे दिलेले चुरमुरे आणि एकट्याने खेळणं – हीच तिची उन्हाळा सुट्टी. पाढे म्हणणं हा नियम होता, कारण बाबा म्हणायचे की पाढे आयुष्यभर उपयोगी पडतात.
आईसोबत उन्हाळी तयारीचे रम्य क्षण
स्वातीला स्वयंपाकाची आवड लहानपणापासूनच लागली. ती सांगते, “आई बटाट्याचा किस, साबुदाण्याचे साणगे, लोणचं, मुरंबा, पन्हं, पापड आणि आंब्याचं कायरस – हे सगळं सुट्टीत करायची. मी तिला मदत करायचे आणि त्यामुळेच माझ्या मुलालाही आज मी या गोष्टी शिकवते. आईकडून मिळालेलं बाळकडू मी माझ्या संसारात वापरतेय.”
फिरणं आणि आजची सुट्टी
सुट्टी मिळाली की आज स्वातीला फिरायला जायला खूप आवडतं. ती सांगते की अलिबाग हे तिचं गाव असून, ती लेह-लडाख, काश्मीर, नरसोबाची वाडी अशी अनेक ठिकाणी फिरते. थंड हवामान असलेल्या ठिकाणी फिरायला तिला विशेष आवडतं.
‘लक्ष्मी निवास’मध्ये मंगळाच्या रूपात काय धूम माजतेय ते पाहायला विसरू नका दररोज रात्री ८ वाजता, फक्त झी मराठीवर.
