एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर

‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

लग्नाच्या थाटामाटाबद्दल अनेक चित्रपटांतून कथा पाहायला मिळाल्या असल्या, तरी घटस्फोटाचं सेलिब्रेशन अशी भन्नाट कल्पना घेऊन येणारा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ अशी हटके टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

वीरकुमार शहा यांची निर्मिती, योगेश भोसले यांचं दिग्दर्शन

वीरकुमार शहा निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात डॉ. भालचंद्र यांचे कथा-संवाद, पी. शंकरम यांचं संगीत, विकास सिंह यांचं छायांकन, तर एस. विक्रमन यांचं संकलन आहे.

नव्या जोडीसह अनुभवी कलाकारांची फौज

चित्रपटात वृषभ शाह आणि शीतल अहिरराव ही फ्रेश जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असून, प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, आणि प्राजक्ता नवले यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांचा समावेश आहे.

घटस्फोटाचं सेलिब्रेशन आणि मनोरंजनाची हमी

नायक-नायिकेचा विवाहाच्या संघर्षाची कथा आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र, घटस्फोटाच्या अनोख्या प्रवासाचं सेलिब्रेशन दाखवणारा हा सिनेमा त्याहून वेगळा ठरणार आहे. ट्रेलरमधूनच गाणी, विनोद, भावनिक ताणतणाव आणि हलक्या फुलक्या ट्विस्टचा मजेशीर फॉर्म्युला सादर करण्यात आला आहे.

२३ मेपासून प्रेक्षकांसमोर ‘मंगलाष्टका रिटर्न्स’

हटके संकल्पना, दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजनाची हमी देणारा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट २३ मे २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘घटस्फोटही एक साजरा करावा असा टप्पा असू शकतो’ हे दाखवणारी ही उलट गोष्ट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल.

Leave a comment