
घरगुती आणि मंगलमय वातावरणात २८वा गौरव सोहळा पार पडला
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि प्रतिभावान संगीतकार स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते, त्यांच्या खार येथील निवास्थानी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने कविता पौडवाल, नितीन तुळपुळे आणि संपूर्ण पौडवाल कुटुंबीय उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.
कलावंतांप्रती कृतज्ञतेचा नम्र आविष्कार – अनुराधा पौडवाल
या पुरस्काराबाबत बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, “अरुणजी एक उच्च दर्जाचे संगीतकार होते. त्यांनी ज्यांच्यासोबत काम केले अशा कलाकारांचा यामाध्यमातून सन्मान करणे, ही आमच्यासाठी भावना व्यक्त करण्याची संधी असते. उत्तरा ताईंसोबत अरुणजींचं विशेष नातं होतं, म्हणून हा सन्मान त्यांना देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे.”
पुरस्कार स्वीकृतीच्या भावविवश क्षणी उत्तरा केळकर यांचे मनोगत
स्वतःच्या भावना व्यक्त करताना उत्तरा केळकर म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि मोठा सन्मान आहे. अरुणजींसोबत काम करताना अनेक आठवणींचा ठेवा मिळाला. त्यांनी मला नेहमी आदराने व उत्तम गायक म्हणून वागवले. त्यांच्या नावाचा हा सन्मान अनुराधा ताईंकडून स्वीकारताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या.”
संगीताच्या स्मृतींना उजाळा देणारा संगीतमय सोहळा
या प्रसंगी दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात पार पडलेल्या सोहळ्यात उत्तरा केळकर यांनी ‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली’ हे भक्तिगीत सादर केलं. ‘अशी ही बनवाबनावी’ चित्रपटातील ‘कोणी तरी येणार येणार गं’ या गाण्याच्या आठवणींनी कार्यक्रमात भावस्पर्शी रंग भरले. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल यांची सर्जनशील जोडी आणि अनुराधा-उत्तरा यांच्या युगल गायनाला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
कार्यक्रमाचं संयोजन चंद्रशेखर महामुनी यांचं योगदान
या घरगुती पण भावनिक सोहळ्याचे संयोजन आणि सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक आणि अरुण पौडवाल यांचे चाहते चंद्रशेखर महामुनी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक जिवंत आणि स्मरणीय ठरला.
या पुरस्कार सोहळ्याने फक्त एका कलाकाराचा सन्मान झाला नाही, तर संगीतविश्वातील एका सच्च्या ऋणनिर्देशनाची जिवंत साक्ष पटली.
