सत्य घटनेवर आधारित ‘शातिर: द बिगिनिंग’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘…तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल’ या जबरदस्त संवादाने सुरुवात करणारा ‘शातिर: द बिगिनिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात वास्तवात घडलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचे भेदक दर्शन घडणार आहे.

समाजमन हेलावणारी कहाणी

विद्यार्थ्यांचे व्यसनाधीनतेकडे झुकणं, ड्रग्स माफियांचे जाळं, पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकलेले प्रश्न आणि महाविद्यालयीन तरुणांनी उभारलेला संघर्ष हे सर्व ‘शातिर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्याच्या पिढीला जागं करणारा आणि समाजात वाईट प्रवृत्तींविरोधात लढा देणारा हा चित्रपट थरार, सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनने भरलेला आहे.

दिग्दर्शनात नवे पर्व

चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील सुशीला दशरथ वायकर यांचे असून हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. त्यांनी सांगितले की, “शातिर माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. अंमली पदार्थांमुळे कोसळणाऱ्या आयुष्यांची कथा मांडताना एक सामाजिक जबाबदारीही पेलावी लागली.”

नायिकेचे दमदार रूप

या चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख अभिनेत्री रेश्मा वायकर या आहेत. त्यांनी सांगितले की, “‘पोरी आम्ही मराठी पोरी’ हे गाणं आजच्या मुलींमध्ये आत्मविश्वास जागवणारं ठरलं आहे. नायिकेच्या भूमिकेतून मी स्वतः अशा वाईट प्रवृत्तींशी लढणारी युवती साकारत आहे, हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं.”

कलाकारांचा उत्साह आणि तगडी टीम

चित्रपटात रेश्मा वायकर यांच्यासह योगेश सुमन, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी हे कलाकार झळकणार आहेत. संगीतकार रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून गीतलेखन वैभव देशमुख यांचे आहे. वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी सजली आहेत.

२३ मेपासून थरारक अनुभव

वास्तविक घटनांवर आधारित, समाजमनाला झंझावातात टाकणाऱ्या विषयावर भाष्य करणारा ‘शातिर: द बिगिनिंग’ हा मराठी अ‍ॅक्शन-सस्पेन्स चित्रपट येत्या २३ मे २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. वास्तव, थरार आणि सामाजिक संदेश यांची मेळ घालणारा हा चित्रपट नक्कीच अनुभवण्याजोगा आहे.

Leave a comment