
३० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अष्टपदी’ चित्रपटाबाबत रसिकांमध्ये वाढली उत्सुकता
‘अष्टपदी’ या संगीतप्रधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, रसिकांच्या मनात चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असून, संगीत, प्रेम आणि भावनांच्या संमिश्रतेची ही कलाकृती रसिकांच्या मनावर गारुड घालणार आहे.
काव्यगंध आणि सुमधूर गीतांनी सजलेली कथा
‘अष्टपदी’च्या ट्रेलरची सुरुवात होते एका अर्थपूर्ण काव्यपंक्तीने — “कुणीच नसावं अवतीभवती, समोर तू असताना…” यानंतर दृश्यांमध्ये दिसतो संतोष जुवेकर साकारत असलेला एक कवीमनाचा नायक आणि त्याच्यासमोर उभी असते मयुरी कापडणे या अभिनेत्रीने साकारलेली नायिका. प्रेमाचे अनेक रंग, द्विधा मनस्थिती, नात्यांची गुंतागुंत आणि भावनांची सळसळ यांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दोन नायक आणि एका नायिकेची कथा असलेल्या या चित्रपटात खरं प्रेम कोणाचं आणि कोणाला मिळणार, याचा थरार प्रेक्षकांना सिनेमागृहात अनुभवता येणार आहे.
सशक्त टीम, दर्जेदार निर्मितीमूल्य
महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशन प्रस्तुत ‘अष्टपदी’ या चित्रपटाची निर्मिती उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी केली आहे. उत्कर्ष जैन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. कथा, पटकथा व संवादलेखन महेंद्र पाटील यांचे असून, ते चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शकही आहेत.
चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी धनराज वाघ यांची असून, गीतलेखन गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांचे आहे, तर संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मिलिंद मोरे यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शन निलेश रसाळ, रंगभूषा अतुल शिधये, वेशभूषा अंजली खोब्रेकर आणि स्वप्ना राऊत यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन दिग्विजय जोशी यांचे असून, कार्यकारी निर्माते अजय खाडे आहेत. या चित्रपटाचे सह-दिग्दर्शक राहुल पाटील आणि नंदू आचरेकर आहेत.
अभिनयाची दमदार फौज
चित्रपटात संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणे यांच्या प्रमुख भूमिका असून, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे, जगदीश हाडप आणि महेश जोशी असे अनुभवी कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
प्रेम आणि मूल्यांची नवीन मांडणी
दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांच्या मते, “‘अष्टपदी’ ही प्रेमाची नवी व्याख्या सांगणारी कलाकृती आहे. यातून आजच्या काळातील नात्यांवर एक संवेदनशील भाष्य करण्यात आलं असून, सध्याच्या पिढीला विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या आर्थिक यशाचा काही भाग राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी देण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
एकूणच काय?
प्रेम, संगीत, संवेदना आणि समकालीन भावविश्व यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या ‘अष्टपदी’ या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या मनात आधीच स्थान मिळवतोय. ३० मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या कलाकृतीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
