पद्मश्री गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘माणिक स्वर शताब्दी २०२४-२५’ म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते त्यांना तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अश्विनी भिडे-देशपांडे यांचे भावस्पर्शी मनोगत

“माझ्या संगीतातील वाटचालीत आजवर अनेक सन्मान लाभले, पण माणिक वर्मा यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे,” अशा शब्दांत भिडे-देशपांडे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. “माणिकताईंबरोबर माझं एक वेगळं नातं होतं. त्यांच्या कलेचा वारसा, त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेलं प्रेम, हे सर्वच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या स्वरोत्सवात माझा सन्मान होणं, हे माझं भाग्य आहे,” असंही त्या म्हणाल्या.

पं. सुरेश तळवलकर यांची आठवणीतली माणिकताई

कार्यक्रमात पं. सुरेश तळवलकर म्हणाले, “कोणतीही कला रुजवण्यासाठी तुमच्यात विनम्रता असली पाहिजे. माणिकताईंच्या व्यक्तिमत्त्वात ती नम्रता होती. त्यामुळेच त्यांनी अनेकांना आपलं केलं. त्यांच्या गाण्याइतकीच त्यांची माणुसकी रसिकांच्या मनात आजही घर करून आहे.”

‘माणिक मोती’ कार्यक्रमातून उलगडलेले आठवणींचे मोती

या कार्यक्रमात चौरंगचे अशोक हांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माणिक मोती’ या विशेष संगीत नाट्याचे सादरीकरण झाले. हांडे म्हणाले, “माणिकताईंसारख्या कलाकारांची स्मृती जपणं आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे.” कार्यक्रमात माणिक वर्मा यांच्या एकाहून एक सरस गीतांची मैफिल रसिकांनी अनुभवली.

गायनात पारंगत, रचनाकार म्हणूनही चमक

अश्विनी भिडे-देशपांडे यांचा जयपूर-आत्रोली घराण्याच्या परंपरेतील ठसा जगभर पोहोचला आहे. पंडित नारायणराव दातार यांच्याकडून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं आणि आई माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रोली गायकीची गहन तालीम घेतली. शास्त्रीय गायनाबरोबरच त्यांनी ठुमरी, दादरा, स्तोत्र, स्तुती यामध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे. संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि स्वतः रचलेल्या बंदिशी यामुळे त्यांचं संगीत अधिक समृद्ध बनत गेलं.

एक स्मरणीय संध्याकाळ, एक प्रेरणादायी सन्मान

या कार्यक्रमात वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि अशोक हांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माणिक वर्मा फाउंडेशन आणि चौरंगतर्फे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी वर्मा यांनी केलं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कार्यक्रमाला प्रायोजित केलं.

‘माणिक स्वर शताब्दी’ वर्षानिमित्त अजूनही अनेक सांगीतिक कार्यक्रम होणार असून, माणिक वर्मा यांच्या समृद्ध वारशाचा गजर संपूर्ण वर्षभर रसिकांना अनुभवता येणार आहे.

Leave a comment