ZEE5 वर पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – ‘अंधार माया’

ZEE5 या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 मे रोजी ‘अंधार माया’ ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज प्रदर्शित होत आहे. ही सीरीज कोकणातल्या एका वाड्यात घडणाऱ्या भयावह घटनांभोवती फिरते, जिथे वेळ आणि तर्काचा उपयोग राहत नाही.

कोकणातला वाडा आणि गूढतेचं साम्राज्य

एका वडिलोपार्जित वाड्यात परतलेल्या कुटुंबाच्या भोवती ही कथा गुंफलेली आहे. हा वाडा केवळ वास्तू नाही, तर त्याच्या भिंतींच्या आत अनेक शतकांचं भय, रहस्य आणि गुंतागुंतीची भावनात्मक नाती दडलेली आहेत. अंधारात लपलेली ही ‘माया’ हळूहळू उलगडत जाते आणि त्या कुटुंबाला आपल्या भीतीशी भिडायला लावते.

झीची मराठी ओटीटी विश्वातील नवी वाटचाल

ZEE5 च्या मराठी विभागाच्या प्रमुख व्ही. आर. हेमा यांनी सांगितलं की, ‘‘अंधार माया ही केवळ एक सीरीज नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर झी मराठीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. स्थानिक कथा, लोककथा, कौटुंबिक संघर्ष आणि मानसशास्त्रीय गूढ यांची प्रभावी मांडणी या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.’’

दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं विशेष योगदान

या सीरीजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी केलं असून निर्मिती एरिकॉन टेलिफिल्म्सची आहे. शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी निर्मिती केली असून, प्रल्हाद कुडतरकर यांनी कथा व संवाद लिहिले आहेत आणि कपिल भोपटकर यांनी पटकथालेखन केलं आहे.

किशोर कदम यांची भीतीदायक व्यक्तिरेखा

या सीरीजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते किशोर कदम ‘गोन्या’ या गूढ व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. या पात्राबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘ही व्यक्तिरेखा माझ्या संपूर्ण अभिनयप्रवासातील सर्वात भीतीदायक होती. त्याच्यात एका अनामिक शांततेचा आणि रहस्यांचा काळोख दडलेला आहे.’’

वाड्याचं भयावह रुप आणि थरारक प्रवास

कथानकात एकेकाळी अभिमानाचं प्रतीक असलेला वाडा आज एका गूढ आणि भयावह अस्तित्वाचं रूप घेतो. कुणीतरी किंवा काहीतरी त्या जागेतून बाहेर पडण्यासाठी झगडतंय असं वाटू लागतं. अंधार, सावल्या, हरवलेले सदस्य, आणि भूतकाळाची पुनरावृत्ती — यामुळे ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरते.

निर्मात्यांचा विश्वास आणि प्रेक्षकांची उत्सुकता

निर्माते म्हणाले, ‘‘अंधारमाया ही सीरीज भावना, गूढता आणि मानवी सत्य यांचं मिश्रण आहे. अशा दर्जेदार सीरीजचं ZEE5 वर लाँच होणं हे मराठी डिजिटल कंटेंटसाठी एक विक्रमी टप्पा ठरणार आहे.’’

दिग्दर्शकाचा दृष्टीकोन आणि कोकणाची पार्श्वभूमी

भीमराव मुडे म्हणाले, ‘‘ही गोष्ट भूतकाळातल्या भूतांची आहे, पण ती तितकीच आपल्यात लपलेल्या भीतीचीही आहे. कोकणातील निसर्ग ही पार्श्वभूमी या कथेसाठी अत्यंत समर्पक ठरली आहे.’’

30 मे रोजी उलगडणार अंधार माया

अंधारात लपलेल्या या भयाच्या गोष्टीचं खरं रूप आणि त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटांचा पडदा उघडणार आहे 30 मे रोजी, फक्त ZEE5 वर.
‘अंधार माया’ – एक अनुभव, जो मनाच्या खोल कप्प्यात घुमत राहील…

Leave a comment