
‘सन मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सोहळा सख्यांचा’ हा केवळ मनोरंजनाचा नाही, तर महाराष्ट्रातील महिलांना स्वतःच्या जीवनप्रवासाविषयी बोलण्याचं एक सशक्त व्यासपीठ ठरतो आहे. विविध पार्श्वभूमीतून आलेल्या स्त्रिया या मंचावरून आपले संघर्ष, यश, आणि अनुभव शेअर करतात. त्यातून अनेक प्रेक्षकांना जगण्याची नवी उमेद मिळते.
१९ मे रोजी प्रसारित होणारा भाग विशेष ठरणार आहे, कारण या भागात दोन वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. सातारा येथे चित्रीत झालेल्या या भागात वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांच्यासह आणखी एका वीरपत्नीने सहभाग घेतला आहे. आपल्या नवऱ्याच्या पश्चात त्यांनी स्वतःचाही जीवनप्रवास देशसेवेस समर्पित केला आहे. निशा भोसले यांचे दोन्ही मुलंही भारतमातेसाठी लढण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील देशभक्तीची साखळी अखंड सुरू आहे.
कार्यक्रमात ‘सन मराठी’कडून निशा भोसले यांना ‘हुकुमाची राणी’चा मान देण्यात आला. त्यांच्या ओटीचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाची सार्वजनिक पातळीवर दखल घेण्यात आली. त्यांच्या जीवनप्रवासातील अडथळे, मनोधैर्य आणि समाजासाठी उभा केलेला आदर्श हा भाग प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे.
या विशेष भागात वीरपत्नींच्या कथांमधून देशभक्ती, कुटुंबातील बळ, आणि स्त्रीशक्ती यांचं उत्कट दर्शन घडणार आहे. त्यांच्या अनुभवांमधून अनेकांना प्रेरणा मिळेल, ही खात्री आहे.
हा अभिमानास्पद भाग पाहायला विसरू नका – ‘सोहळा सख्यांचा’, रविवार, १९ मे, सायंकाळी ६.३० वा., फक्त ‘सन मराठी’वर.
