‘पायवाटाची सावली’ ३० मे रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात लेखकाच्या संघर्षमय प्रवासाचा वेध

मराठी चित्रपटसृष्टीने आजवर अनेक सामाजिक, भावनिक आणि वास्तववादी कथांद्वारे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. त्याच परंपरेत ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका मुन्नावर शमीम भगत यांनी साकारली आहे.

खऱ्या जीवनातून साकारलेली कथा

दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत सांगतात, “हा माझा चौथा मराठी चित्रपट असून याआधी मी ‘निवडुंग’ आणि ‘गाव पुढे आहे’ सारखे चित्रपट केले आहेत. ‘पायवाटाची सावली’ची कल्पना माझ्या मनात अनेक वर्षांपासून होती. या कथेतून मी सांगू इच्छितो की, जीवनात कितीही अंधार आला तरी आशेचा एक किरण आपल्याला पुढे जाण्यास प्रेरणा देतो.”

नवोदित कलाकारांना दिली संधी

कोल्हापूरमध्ये एका नाटकात काम करणाऱ्या नवोदित कलाकारांच्या अभिनयाने भारावून जाऊन त्यांना चित्रपटात संधी देण्यात आली. या चित्रपटात प्रसाद माळी, रेवती अय्यर, रोशनी चौबे, संजय टिपूगडे, एन. डी. चौघुले, शाल्वी शाह आणि शीतल भोसले हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपट महोत्सवात २३ पुरस्कारांचा बहुमान

‘पायवाटाची सावली’ चित्रपटाने आतापर्यंत विविध चित्रपट महोत्सवांतून एकूण २३ पुरस्कार पटकावले असून, याचा दिग्दर्शकाला विशेष अभिमान आहे. हा चित्रपट एका लेखकाच्या आत्मसंघर्षावर भाष्य करतो, जो परिस्थितीशी झगडत आपली स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न करतो.

संकल्पनेतून साकारलेली प्रेरणादायी कलाकृती

या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अशी सर्व जबाबदारी एकहाती सांभाळलेले मुन्नावर शमीम भगत म्हणतात, “मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे संवाद सादर करताना अडचण आली नाही. लहानपणापासून सिनेमाची आवड असल्यामुळे हे स्वप्न साकार करणं माझ्यासाठी खास आहे.”

तांत्रिक बाजू आणि वितरण

चित्रपटासाठी अमित अनिल बिश्वास यांनी संगीत दिलं असून समीर सक्सेना यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका निभावली आहे. चित्रपटाचे वितरण अकात डिस्ट्रीब्यूशनचे चंद्रकांत विसपुते करणार आहेत.

एक साधा पण खोल अर्थ असलेला चित्रपट

‘पायवाटाची सावली’ हा चित्रपट फक्त एका काकाच्या भूमिकेत अडकलेला माणूस नाही, तर तो संघर्ष करणाऱ्या प्रत्येक लेखकाचा, कलाकाराचा आणि सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. ३० मे रोजी चित्रपटगृहात भेट देऊन हा प्रेरणादायी प्रवास अनुभवायला विसरू नका.

Leave a comment