‘ऊत’ मराठी चित्रपटाचे कान्स चित्रपट महोत्सवात यशस्वी स्क्रीनिंग

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरावी असा क्षण म्हणजे ‘ऊत’ या चित्रपटाचे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेले विशेष स्क्रीनिंग. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘ऊत’ आता कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावरही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.

विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘ऊत’ची यशस्वी घोडदौड

‘ऊत’ चित्रपटाने यापूर्वी मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा विविध महोत्सवांत सहभाग घेत यश मिळवलं आहे.

राम मलिक यांच्या दिग्दर्शनाखाली युवा कलाकारांची दमदार भूमिका

‘ऊत’ चित्रपटाचे दिग्दर्शन राम मलिक यांनी केलं असून, या चित्रपटात राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकले आहेत.

कान्समध्ये मिळालेला प्रतिसाद म्हणजे टीमसाठी मोठा सन्मान – राज मिसाळ

चित्रपटाच्या कान्समधील यशस्वी प्रदर्शनानंतर प्रमुख अभिनेता राज मिसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कान्ससारख्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर ‘ऊत’ला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. समाजाभिमुख दृष्टिकोनातून मांडलेली कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, याचा आनंद आहे.”

‘ऊत’ एक सामाजिक विषय मांडणारा आशयघन चित्रपट

‘ऊत’ हा चित्रपट एक ज्वलंत सामाजिक विषय मांडतो आणि लवकरच तो रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याने मराठी प्रेक्षकांसाठी हा एक महत्वाचा सिनेअनुभव ठरणार आहे.

Leave a comment