
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवणारा हिंदी चित्रपट ‘चिडिया’ येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर गाजत असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक विशेष स्क्रिनिंग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते. हे स्क्रिनिंग महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी खास आयोजित करण्यात आले होते.
बालपण, संघर्ष आणि स्वप्नांची हृदयस्पर्शी कथा
‘चिडिया’ ही मुंबईच्या चाळीत घडणारी आणि बालपणातील स्वप्न व संघर्ष यांचे प्रभावी चित्रण करणारी कथा आहे. या कथेत मुलांची निरागसता, त्यांची लवचिकता आणि स्वप्नं पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरेखपणे मांडण्यात आली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन मेहरान अमरोही यांचे
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मेहरान अमरोही यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती की मीडिया वर्क्स आणि उदाहरणार्थ निर्मित या बॅनरखाली झाली असून, स्मायली फिल्म्स यांनी याची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाबद्दल आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
चित्रपट पाहिल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हा चित्रपट अतिशय उत्तम झाल्याचे सांगितले. “चित्रपट सगळ्यांनी जरूर पहावा,” असे आवाहन करत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.
अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेली ‘चिडिया’
‘चिडिया’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली असून, आता तो भारतातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे, असे माहिती चित्रपटाचे निर्माता अकबर हुसैनी यांनी दिली.
तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट तांत्रिक बाजू
या चित्रपटात विनय पाठक, अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांसारख्या कसलेल्या कलाकारांसह स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा हे बालकलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, तर कलादिग्दर्शन प्रीतेश खुशवाह यांचे आहे. चित्रपटाचे वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करणार आहे.
