सॅन होजे– कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी महोत्सवाची अधिकृत घोषणा

‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजीत घोलप यांची संकल्पना

‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ म्हणजेच ‘नाफा’च्या दुसऱ्या भव्य महोत्सवाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. २०२५ साली २५, २६ आणि २७ जुलै रोजी कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला भारतीय आणि कॅनडातील मराठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

मराठी चित्रपटसृष्टीचं सातासमुद्रापार विस्तारतं स्वप्न

नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या मते, अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटविश्व निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. नाफाच्या माध्यमातून साडेपाच लाखांहून अधिक उत्तर अमेरिकन मराठी प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार मराठी चित्रपट पोहोचवले जात आहेत.

प्रत्येक महिन्याला एक मराठी चित्रपट – अमेरिकेत प्रदर्शित

२०२४ पासून दर महिन्याला एका मराठी चित्रपटाचा अमेरिका-कॅनडामध्ये प्रदर्शन होत असून, गुलकंद, पाणी, चिकीचीकी बुबुम्बुम, स्थळ, नवरा माझा नवसाचा २ यांसारख्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत.

फिल्म क्लब, कार्यशाळा आणि कलावंतांसाठी नव्या संधी

अमेरिकेत मराठी कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण व्हावं, यासाठी नाफा ‘फिल्म क्लब’च्या माध्यमातून लघुपट निर्मिती, प्रशिक्षण कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करत आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर यांसारख्या मान्यवरांचा सहभागही लाभला आहे.

नाफा २०२५ मध्ये दिग्गज कलाकारांची उपस्थिती

या वर्षीच्या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

बीएमएमच्या महाराष्ट्र मंडळांचा महोत्सवाला पाठिंबा

अमेरिकेतील बीएमएमच्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य नाफा महोत्सवाला लाभले आहे. या सहयोगामुळे हा सोहळा अधिक व्यापक आणि प्रभावी ठरणार आहे. अभिजीत घोलप म्हणतात, “मराठी चित्रपट सातासमुद्रापार पोहचवण्यासाठी सुरू केलेला नाफाचा प्रवास आता एका चळवळीचं रूप घेत आहे. सर्व कलावंतांच्या साथीने ही कल्पना पूर्णत्वास जाईल, याची मला खात्री आहे.”

२५, २६, २७ जुलै २०२५ – सॅन होजे होणार मराठी चित्रसृष्टीचं हॉलिवूड!

Leave a comment