
प्रसारमाध्यमे ही केवळ माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब आणि दिशादर्शक ठरतात. त्यांच्या भक्कम जडणघडणीत अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे योगदान लाभले आहे. या कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘माई मीडिया २४’ व ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ तर्फे ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ हा पुरस्कार सोहळा ३ जून रोजी शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न होणार आहे.
माध्यमविश्वातील मान्यवरांचा गौरव
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील प्रभावी कार्य करणाऱ्या दिग्गजांचा सन्मान होणार आहे. यामध्ये कला, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पर्यावरण संवर्धन, पत्रकारिता अशा विविध विभागांतील नामवंतांचा समावेश आहे.
मुख्य पाहुणे आणि विशेष गौरव
या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, पद्मश्री अशोक सराफ, विजय पाटकर, प्रा. राम शिंदे, नीलमताई शिर्के-सामंत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गौरवप्राप्त मान्यवर यादी
- सयाजी शिंदे – निसर्ग संवर्धन
- प्रसाद गावडे – उद्योग, पर्यटन
- डॉ. नीलम गोऱ्हे – साहित्य
- सुजाता रायकर – आरोग्य / थॅलेसेमिया मुक्ती
- डॉ. प्रदीप ढवळ – सांस्कृतिक साहित्य
- अँड. संगीता चव्हाण – स्त्री सक्षमीकरण
- संतोष पवार – लोककला संवर्धन
- वैदेही परशुरामी – लक्षवेधी अभिनेत्री
- नीतीन केळकर – पत्रकारिता जीवनगौरव
- अनन्या गोयंका – शिक्षण व समाजकार्य
- किशोर आपटे, मोहन बने, श्रीकांत बोजेवार, संजीव भागवत, विशाल पाटील, प्रेरणा जंगम, श्वेता वडके, रविराज इळवे – पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान
फक्त पुरस्कार नव्हे, तर लोकजागर
या कार्यक्रमात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा संवर्धन, उद्योग, शेतकरी, निसर्ग आणि पर्यावरण पर्यटन यासारख्या विषयांवरही चर्चा व जनजागृती होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संयोजन आणि सहकार्य
या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक — शीतल हरीष करदेकर (संस्थापिका अध्यक्षा), सचिन चिटणीस, कपिल देशपांडे, चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, गणेश तळेकर, सुरज खरटमल यांनी सांभाळले आहे. प्लॅनेट मराठी या सोहळ्याचे विशेष सहप्रायोजक आहेत.
माई – एक समाजहिताची चळवळ
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ ही संस्था केवळ बातम्यांपुरती मर्यादित न राहता सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय सहभाग घेत आहे. ‘लोकजागर’ या चळवळीमधून उभी राहिलेली ही संघटना देशपातळीवर माध्यम कर्मचाऱ्यांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.
