
ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं अनोखं मिलन
‘झी मराठी’वर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘चल भावा सिटीत’ हा अनोखा रिऍलिटी शो प्रेक्षकांचा लाडका बनला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच “कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय!” म्हणत धडाकेबाज प्रवेश झाला होता. ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांना एकत्र आणणाऱ्या या शोने रिऍलिटी शोच्या पारंपरिक चौकटी मोडून टाकल्या.
जीवनाच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेणारा प्रयोग

ग्रामीण-शहरी जीवनशैलीमधील फरक समजून घेण्यासाठी स्पर्धकांनी एकमेकांच्या जागी जाऊन अनुभव घेतले. विविध आव्हानांमधून गेले आणि सामाजिक समज, भावना आणि संघर्षांना समजून घेत एकमेकांशी जुळवून घेतले. हा प्रवास मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरला.
ह्रृषीकेश आणि श्रुतीने मिळवली ट्रॉफी

‘चल भावा सिटीत’ च्या पहिल्या सीजनचा विजेता ठरला मर्दानी छातीचा, तांबड्या मातीचा पेहलवान ह्रृषीकेश युवराज चव्हाण. यांकोबा तालमीच्या मैदानात घडलेला हा रांगडा गडी श्रुती राऊळच्या सोबतीने अंतिम विजेता ठरला. श्रुतीने ह्रृषीकेशच्या प्रत्येक टप्प्यावर मनोबल वाढवत त्याला मदतीचा खंबीर आधार दिला.
१० लाखांची बक्षीस रक्कम आणि सन्मान
एकमेकांशी समरस होऊन, आव्हानं पेलून, ह्रृषीकेश-श्रुती जोडीने शोचा मुकुट जिंकला. त्यांना विनर ट्रॉफी आणि ₹१०,००,०००/- ची बक्षीस रक्कम मिळाली. ही जोडी शोमधील एकमेकांची खरी साथीदार म्हणून ओळखली गेली.
महाअंतिम सोहळ्याची झगमगती रंगत

‘चल भावा सिटीत’ च्या महाअंतिम सोहळ्यात किरण गायकवाड उर्फ देवमाणूस याने आपला खास अंदाज दाखवत धमाल केली. ‘अंधार माया’ या झी५ वेब सिरीजची टीम विशेष पाहुणी म्हणून उपस्थित होती. वल्लरी विराज उर्फ लाडकी लीला हिने आपल्या परफॉर्मन्सने वातावरणात उत्साह भरला.
ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा झळकली स्क्रीनवर
या शोमुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला प्रेक्षकांसमोर नवा चेहरा मिळाला. लोकजीवन, संस्कृती आणि संघर्षाची एक सुंदर झलक ‘चल भावा सिटीत’ ने सादर केली.
