अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला, ‘ऑल इज वेल’ चित्रपट २७ जूनला होणार प्रदर्शित

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण आता मागे पडणार असून ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ अशी धमाल मैत्रीची गोष्ट ‘ऑल इज वेल’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर या त्रिकुटाची धमाल दोस्ती रंगणार आहे.

मनोरंजन आणि मस्तीचा जबरदस्त मेळ

‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजन आणि मस्तीचे परिपूर्ण पॅकेज असून दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे. कथा आणि पटकथा प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेली असून निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी. चित्रपट २७ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनयातील त्रिमुर्ती पहिल्यांदाच एकत्र

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार असून त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांच्यासारखे अनुभवी कलाकारही आहेत.

पोटापाण्याच्या शोधात आलेली धमाल तिकडी

मुंबईत पोटापाण्याच्या शोधात आलेले अमर, अकबर आणि अँथनी यांच्या आयुष्यात अचानक घडलेली एक घटना त्यांच्या आयुष्याची उलथापालथ करते. ती घटना त्यांच्या मैत्रीत काय वळण आणते, त्यावर आधारित हा चित्रपट आहे. दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ही कथा अत्यंत मजेशीर आणि भावस्पर्शी पद्धतीने सादर केली आहे.

तांत्रिक बाजूला अनुभवी हातांची साथ

चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे असून संवाद, पटकथा आणि गीत प्रियदर्शन जाधव यांचे आहेत. संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे, वेशभूषा कीर्ती जंगम आणि रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे आणि साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत.

गाणी आणि गायकीचीही खास रंगत

गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलेली गाणी रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी स्वरबद्ध केली आहेत. गाणीही कथानकाला पूरक ठरणारी असून मनोरंजनात भर टाकणारी आहेत.

‘ऑल इज वेल’ म्हणत धडाकेबाज एन्ट्री

प्रियदर्शन, अभिनय आणि रोहित हे जबरदस्त त्रिकुट ‘ऑल इज वेल’ म्हणत २७ जूनला चित्रपटगृहात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.

Leave a comment