
झी मराठीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता वाढताना दिसते आहे. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण विशेषत: ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांची हिम्मतराव देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे.
हिम्मतराव देशमुख म्हणजे कोण?
माधव अभ्यंकर सांगतात, “या मालिकेत मी हिम्मतराव देशमुख ही भूमिका साकारत असून तो पेशाने शेतकरी आणि पैलवान आहे. एकेकाळी कुस्तीच्या मैदानात अनेकांना मात दिलेली ही व्यक्तिरेखा आता जरी कुस्ती खेळत नसलो तरी त्याचा तोरा टिकवून आहे. त्याच्या दोन बायका आहेत – रंजना आणि फुलादेवी. त्याचं बायकांबद्दलचं विशेष आकर्षण आणि त्यासाठी खर्चलेली संपत्ती ही त्याच्या आयुष्याची वेगळी बाजू दाखवते.”
भूमिकेतील गुंतागुंत आणि मेहनतीचा प्रवास
“या भूमिकेसाठी मला सातारच्या भागातील विशेष लहेजा आत्मसात करावा लागला. मी पूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये मालवणी भाषा शिकली होती, त्यासाठी मी ‘येवा कोकण आपलाच असा’ नाटक वाचून भाषेवर काम केलं होतं. तसंच आता सातारची भाषा आत्मसात करण्यासाठी मी गावातील माणसांबरोबर संवाद साधतो, त्यांच्या बोलण्याची ढब, लहेजा, शब्द यांचा अभ्यास करतो.”
श्वेता शिंदे यांच्याशी नातं आणि भूमिकेची सुरुवात
माधव अभ्यंकर पुढे सांगतात, “या मालिकेत काम करण्याचा योग निर्माता श्वेता शिंदे यांच्या मेसेजनं आला. त्यांनी मला विचारलं की मी सध्या काय करतोय आणि नंतर स्पष्ट सांगितलं की ही भूमिका मीच करायची आहे आणि कोणालाही डेट देऊ नका. त्यानंतर लुक टेस्ट आणि ऑडिशन झाली.”
झी मराठीसोबतचं जिव्हाळ्याचं नातं
“मी अनेक मालिका केल्या आहेत, पण झी मराठीसोबत माझं एक वेगळंच नातं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ आणि त्याआधी ‘कळत नकळत’ या दोन्ही मालिकांनी मला मोठ्या प्रमाणावर ओळख मिळवून दिली.”
प्रत्येक भूमिका म्हणजे आव्हान
“मला त्या प्रकारचं काम आवडतं जिथे घाम गळायला हवा. मला भूमिकेवर मेहनत घ्यायला आवडते, मग ती भाषा, बॉडी लँग्वेज किंवा लुक असो. मला खात्री आहे की प्रेक्षक हिम्मतराव देशमुख या भूमिकेलाही तेवढंच प्रेम देतील.”
‘अण्णा इज बॅक’ची चर्चा
“प्रेक्षक अजूनही ‘रात्रीस खेळ चाले’ मधील अण्णा नाईक या भूमिकेला विसरले नाहीत. जेव्हा देवमाणूसचा प्रोमो रिलीज झाला तेव्हा ‘अण्णा इज बॅक’ असं सोशल मीडियावर चर्चिलं जात होतं.”
दैनिक प्रसारण आणि प्रेक्षकांसाठी विशेष आवाहन
‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका दररोज रात्री १०:०० वाजता झी मराठीवर प्रसारित होते. माधव अभ्यंकर यांनी शेवटी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की, “ही मालिका पाहा आणि आम्हाला जरूर कळवा की तुम्हाला ती कशी वाटतेय.”
