गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

अभिनयाच्या पलीकडे गश्मीरचा नवा प्रवास
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय, हिंदी मालिका आणि नृत्य यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर आता तो लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून पदार्पण करत आहे.

सोशल मीडियावर मुहूर्ताची खास घोषणा
गश्मीरने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची घोषणा सोशल मीडियावर केली. ‘जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन’ या संस्थेअंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने गश्मीरने एक नवीन प्रवास सुरू केला आहे.

महाजनी कुटुंबीयांची निर्मिती क्षेत्रात साथ

या चित्रपटाचे निर्माते गश्मीरसोबतच गौरी महाजनी आणि माधवी महाजनी आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत असून, छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून होणार आहे. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला
चित्रपटाचे नाव आणि कलाकार अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले, तरी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गश्मीरच्या चाहत्यांना या चित्रपटातून एक वेगळी कलात्मक झलक पाहायला मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिग्दर्शनाविषयी गश्मीरचे भावनिक वक्तव्य
आपल्या या नव्या प्रवासाविषयी बोलताना गश्मीर म्हणतो, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकल्या, अनुभवल्या आणि आत खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात.”

वाढदिवस आणि दिग्दर्शनाची सुरुवात — एक खास क्षण
गश्मीर पुढे म्हणतो, “माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”

Leave a comment