
स्त्री सशक्तीकरण आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची कहाणी सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. मंजिरा गांगुली यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून रिजू रॉय यांनी संगीतबद्ध केले आहे.
सरलाच्या आयुष्यातील वेदनांचा सूर
चित्रपटातील मुख्य पात्र सरलाच्या जीवनातील अपूर्ण स्वप्नं, हरवलेलं प्रेम आणि नात्यांमधील कटू अनुभव यांचा भावनिक प्रवास या गाण्यातून उलगडतो. नवऱ्याच्या अहंकारामुळे होणारा मानसिक त्रास आणि स्त्रीच्या अंतर्मनातील वेदना यांचं अत्यंत हळव्या पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे.
दिग्दर्शक अशोक आर. कोंडके यांचे मनोगत
“रेशमी धागे विरून गेले हे गाणं सरलाच्या अंतःकरणातील यातना मांडतं. जेव्हा स्त्रीला तिच्याच लोकांकडून अपमान आणि एकटेपणाचा अनुभव येतो, तेव्हा तिचं अंतरंग फाटत जातं, अश्रूंमधून तिच्या भावना प्रकट होतात आणि हेच या गाण्यातून दाखवलं आहे,” असे दिग्दर्शक अशोक आर. कोंडके यांनी सांगितले.
निर्माते सुब्रमण्यम के. यांचे विचार
“वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट म्हणजे समाजातील असंख्य स्त्रियांच्या लढ्यांचा आरसा आहे. ‘रेशमी धागे विरून गेले’ या गीतात एका हतबल स्त्रीची हाक आहे. ही गाणी केवळ स्वर नाहीत, तर असंख्य सरलांची हाक आहे,” असे मत निर्माते सुब्रमण्यम के. यांनी व्यक्त केले.
चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि निर्मिती तपशील
ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे. या चित्रपटात कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, आणि जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वामा – लढाई सन्मानाची’ ही कथा केवळ एका स्त्रीची नाही, तर समाजातील अनेकांच्या आयुष्यातल्या वास्तवाचं प्रतिनिधित्व करणारी आहे.
