
मराठी भाषेचा गोडवा जितका शब्दांत, तितकाच स्वभावात
मराठी ही भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. या भाषेचा गोडवा केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता तो माणसाच्या स्वभावातूनही व्यक्त होतो. अशाच मराठमोळ्या गोडव्याचा अनुभव देण्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे प्रेक्षकांसमोर येणार आहेत एका हटके भूमिकेतून – ‘आप्पा’ या भाईच्या व्यक्तिरेखेतून.
शुद्ध मराठीत भाईगिरी – ‘आप्पा’ उर्फ सयाजी शिंदे यांचा झणझणीत अंदाज
वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात सयाजी शिंदे एका भाईच्या म्हणजेच डॉनच्या भूमिकेत झळकणार आहेत. पण ही भाईगिरी साचलेल्या हिंदी गल्लीतली नसून शुद्ध प्राकृत मराठीतील असेल. एकेकाळच्या ‘बोल बच्चन’ शैलीतील पात्रासारखा हा भाई स्वच्छ, प्रांजल मराठीत संवाद साधणार आहे आणि अनेकांची विकेट काढणार आहे.
दिग्दर्शक आणि लेखक जोडीचा हटके प्रयोग
चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. दोघांची ही जोडी ‘आप्पा’ या व्यक्तिरेखेला वेगळा टोन देण्यासाठी शुद्ध मराठीचा वापर करून ती अधिक लक्षवेधी बनवत आहे. या निवडीबद्दल सयाजी शिंदे म्हणतात, “डॉनची भूमिका जरी आहे, तरी त्यात काहीतरी वेगळं हवं होतं. शुद्ध मराठीमुळे तिचं वेगळेपण अधिक ठसतं.”
अमर-अकबर-अँथनीच्या मैत्रीचा धमाल प्रवास
चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे अमर, अकबर आणि अँथनी या तीन मित्रांभोवती फिरणारी. या तिघांची अतूट मैत्री, गोंधळ, भावनिक गुंतवणूक आणि त्यातले हळवे क्षण ‘ऑल इज वेल’मध्ये रंगवले आहेत. या भूमिकांमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे कलाकार झळकणार आहेत.
तगड्या कलाकारांची मांदियाळी
या चित्रपटात अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांच्यासह अनेक अनुभवी व नवोदित कलाकार आपली छाप पाडतील.
संकल्पनेपासून तांत्रिक बाजूपर्यंत ठसठशीत हाताळणी
‘ऑल इज वेल’चे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत क्षेत्रात चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं योगदान असून छायांकन मयुरेश जोशी यांचं आहे. संकलन अथश्री ठुबे यांनी केलं आहे.
नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांचे, साहस दृश्यांची मांडणी अजय ठाकूर पठाणीया यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी स्वरबद्ध केली आहेत.
२७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार धमाल
‘ऑल इज वेल’ हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. भाईगिरीच्या मराठमोळ्या रंगांनी आणि मैत्रीच्या धम्माल प्रवासाने नटलेला हा चित्रपट प्रेक्षकांना किती ‘वेल’ वाटतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
