
भक्ति, अध्यात्म आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या एका महामानवाच्या जीवनावर आधारित ‘संत तुकाराम’ हा भव्य हिंदी चित्रपट कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत १८ जुलै २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आदित्य ओम यांनी लिहिला असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे.
१७व्या शतकातील संतकवीच्या आयुष्याला सिनेमॅटिक न्याय
मराठी संत परंपरेतील महान संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील दुःख, संघर्ष, सामाजिक जागृती आणि भक्तिमार्गाचा प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे उलगडला जाणार आहे. त्यांची वैयक्तिक वेदना आणि भक्तीमधून मिळालेली शक्ती — ही कथा केवळ ऐतिहासिक नाही, तर आजच्या काळातीलही भाष्य ठरेल.
संत तुकारामांच्या भूमिकेत सुभोध भावे
सुभोध भावे हे संत तुकाराम यांच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या भावनात्मक आणि अभ्यासपूर्ण अभिनयशैलीमुळे तुकारामांची शोकान्तिका, आत्मप्रत्यय आणि भक्तीमय अभंगांचे तत्त्वज्ञान प्रेक्षकांपर्यंत सजीवपणे पोहोचेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
दिग्गज कलाकारांची मजबूत फळी
या चित्रपटात शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव, आणि डीजे अकबर सामी यांचा अभिनय अनुभवायला मिळणार आहे. विशेषतः मुकेश खन्ना सूत्रधाराच्या भूमिकेत असणार असून त्यांच्या आवाजातून या चित्रपटाला एक आध्यात्मिक दिशादर्शन मिळणार आहे.
संगीतात भक्ती आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचा संगम
चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवि त्रिपाठी, आणि वीरल-लावण यांनी दिले असून, त्यात भक्तिरसात न्हालेलं शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील अभंग हे केवळ संगीत नसून, ते संत तुकारामांच्या आत्मप्रत्ययाचा आणि सामाजिक प्रबोधनाचा गूढ स्वर आहेत.
सर्व धर्म, भाषा आणि प्रांतांसाठी एक सार्वत्रिक संदेश
बी. गौतम प्रस्तुत कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज निर्मित ‘संत तुकाराम’ हा चित्रपट केवळ हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी नाते सांगणाऱ्या सर्व प्रांतातील आणि धर्मातील प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
१८ जुलै २०२५ रोजी ‘संत तुकाराम’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात — एक सिनेमॅटिक अनुभव ज्यामध्ये शांतीचं बळ आणि भक्तीचं सत्य एकत्र उलगडतं.
