‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

मराठी चित्रपट ‘जारण’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यातील वीकेंडला या चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अलीकडच्या काळातील सर्वाधिक कमाईचा आकडा गाठला आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सशक्त कथा आणि अभिनय

अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने सजलेला ‘जारण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. वास्तवाशी जोडलेली कथा, भावनिक उंची गाठणारी मांडणी, आणि दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांचे प्रगल्भ दिग्दर्शन यामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची विशेष चर्चा सुरू असून त्यांचे काम समीक्षकांनीही उचलून धरले आहे.

चित्रपटगृहांमध्ये वाढवले जात आहेत शो

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शोज वाढवले जात आहेत. प्रत्येक शोमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून, सर्व वयोगटातील प्रेक्षक या संवेदनशील चित्रपटाशी स्वतःला जोडत आहेत. प्रेम, संघर्ष आणि सामाजिक वास्तव या त्रिसूत्रीवर आधारित ‘जारण’ प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून देतो.

दिग्दर्शक आणि निर्मात्यांची प्रतिक्रिया

दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “संवेदनशील विषयावर आधारित चित्रपटाला असा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय याचा अत्यंत आनंद आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांकडून मिळालेलं कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”

निर्माते अमोल भगत यांच्या मते, “थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढणारा गल्ला, आणि सोशल मीडियावरील प्रेम – हे सगळं आमच्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीचं फळ आहे.”

बळकट निर्मिती आणि दर्जेदार तांत्रिक बाजू

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांचं आहे. निर्मिती अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी केली असून मनन दानिया सहनिर्माते आहेत.

कलाकारांच्या अभिनयाने मिळवलेलं यश

चित्रपटात अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळतो. कलाकारांच्या सशक्त सादरीकरणामुळे आणि कथा-संवादांच्या प्रभावी मांडणीमुळे ‘जारण’ एक उल्लेखनीय मराठी चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे.

Leave a comment