
प्रेमकथेतील ‘हिरो’ जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडे हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती एकटीच नाही, तर तब्बल सहा लोकप्रिय अभिनेत्यांच्या संगतीत आहे! ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटात हे सहा अभिनेते झळकणार असल्याचं आधीच जाहीर झालं होतं, मात्र या नव्या फोटोने उत्सुकतेला अधिकच खतपाणी घातलं आहे.
फोटोवरून सुरू झाल्या मजेशीर प्रतिक्रिया
मृण्मयीने फोटो पोस्ट करताच तिच्या कमेंटबॉक्समध्ये सहकलाकारांची मजेशीर आणि मिश्कील प्रतिक्रिया येऊ लागल्या. अभिजित खांडकेकरने विचारलं, “समजा सात हिरो असते तर खूप बदलली असती का गोष्ट?”, तर अमेय वाघ म्हणतो, “आमचे दिल आणि दोस्ती बरोबर कास्ट केले आहेस! मला मात्र दुनियादारी दाखवलीस!” सिद्धार्थ चांदेकरने खोचक प्रतिक्रिया देताना म्हटलं, “हे आहेत का गं तुझे मनाचे श्लोक? तुझ्या पोपटी चौकटीतून मला बाहेर काढलंस? थँक्स गं मृण्मयी.”
गौतमी देशपांडेची ‘हिरोईन’ बनण्याची तक्रार
या सर्व प्रतिक्रियांमध्ये खास लक्ष वेधून घेतलं ते मृण्मयीची बहीण गौतमी देशपांडे हिने. ती म्हणाली, “सहा हिरो असताना अजून एखादी हिरोईन वाढवली असती (म्हणजे मी) तर काय बिघडलं असतं?” या मिश्कील तक्रारीने चाहत्यांमध्ये हास्याची लाट उसळली.
मृण्मयीचा खरा हिरो कोण? चर्चेला उधाण
या फोटोमुळे सध्या सर्वात मोठा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जातोय तो म्हणजे – मृण्मयीचा हिरो कोण? राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब – या सहा जणांमध्ये नायक कोण असणार, हे अजूनही गूढ आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आता नक्कीच उधाण आलं आहे.
गणराज स्टुडिओ आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सचा भविष्यातील आश्वासक चित्रपट
गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा एक्सपरिअन्स’ निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन स्वतः मृण्मयी देशपांडे हिने केलं आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याआधीच तो चर्चेचा विषय ठरतो आहे. मृण्मयी आपल्या हिरोचं नाव कधी उघड करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!
