
११ वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन
सध्या ‘शुभविवाह’ ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे. आकाशच्या अपघातानंतर त्याचे प्राण वाचवण्यासाठी भूमी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. अशातच या उपचारांसाठी भारतातील नामवंत न्युरो सर्जन डॉ. संकर्षण अधिकारी यांची एण्ट्री होणार आहे.
डॉ. संकर्षण अधिकारीच्या भूमिकेत चिन्मय उद्गिरकर
ही भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्कंठा आता संपली असून, सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्गिरकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेने चिन्मयला घराघरात पोहोचवलं होतं. तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे.
डॉ. संकर्षण: एक संवेदनशील डॉक्टर आणि गंभीर व्यक्तिमत्व

चिन्मय म्हणतो, “ही भूमिका ऐकताना मला ती लगेचच भावली. डॉ. संकर्षण हा अत्यंत शिस्तबद्ध, कमी बोलणारा, आपलं कामच सर्वोच्च मानणारा माणूस आहे. आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारा… पण बायकोच्या अपघाती मृत्यूनंतर तो कोलमडून पडलेला आहे. त्याचं संपूर्ण आयुष्यच जणू थांबलंय.”
भूमीसमोर डॉक्टरची कठीण अट
डॉ. संकर्षण आकाशवर उपचार करायला तयार होतो, पण त्यासाठी तो भूमीसमोर एक अट ठेवतो. ही अट नक्की काय आहे? भूमी ती अट स्वीकारणार का? आणि आकाशचा जीव वाचणार का? — हे पाहणं प्रेक्षकांसाठी अधिकच उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘शुभविवाह’ दररोज दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर
चिन्मय उद्गिरकरच्या दमदार पुनरागमनामुळे ‘शुभविवाह’ या मालिकेची कथा आणखी रंगतदार होणार आहे. प्रेक्षकांनी ही अनोखी आणि हृदयस्पर्शी कथा अनुभवण्यासाठी नक्की पाहावं ‘शुभविवाह’, दररोज दुपारी २ वाजता, स्टार प्रवाहवर.
