आज्जीबाई निघाली शाळेला…

मराठी रंगभूमीवर AI महाबालनाट्याची यशस्वी धडक

जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित “आज्जी बाई जोरात” हे म मराठी प्रस्तुत मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ठरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नाटकाने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण केली आणि प्रेक्षकांना हसवत, गात, नाचवत एक वेगळा अनुभव दिला.

बालकांसोबत पालकही झाले आज्जीचे चाहते

निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसह ११ कलाकारांच्या चमकदार कामगिरीने नाटकाने सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक पालकांनी “मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचे काम या नाटकाने केले आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.

पुस्तक विक्रीत वाढ, मराठीला नवा चेहरा

या नाटकामुळे उन्हाळी सुट्टीत पुस्तकांची विक्रीही लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करतानाच AI च्या साहाय्याने रंगभूमीवर एक नवा प्रयोग पाहायला मिळत आहे.

मराठीसाठी आज्जी शाळेच्या दिशेने निघाली

महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मराठी सक्तीची न राहिल्याने, आज्जी आता शाळांमध्ये पोहोचण्याच्या मोहिमेवर निघाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे सांगतानाच, तिला आपल्या घरातून, शाळांमधून बाहेर ठेवण्याची प्रक्रिया दुर्दैवी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

६ जुलैला यशवंत नाट्यमंदिरात विशेष प्रयोग

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे दुपारी ४ वाजता “आज्जी बाई जोरात” या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

शाळांसाठी सवलतीत तिकीट उपलब्ध

विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या प्रयोगाची तिकीट दर सवलतीत ठेवण्यात आली आहेत. घराघरात पोहोचलेली आज्जी आता आपल्या नातवंडांसोबत शाळेत पोहोचते आहे. चला, आपण सुद्धा या मराठीच्या मोहिमेत सहभागी होऊया!

Leave a comment