
ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी
मुंबई लोकल या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं असून, बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी निर्मिती केली आहे. त्र्यंबक डागा हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
कलाकारांची तगडी फौज
या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासह मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे यांचा समावेश असून सर्वांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तांत्रिक बाजू आणि संगीत विभाग
चित्रपटाचं छायांकन योगेश कोळी यांनी केलं असून, संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर असून, कलादिग्दर्शनाची जबाबदारी डॉ. सुमित पाटील यांनी सांभाळली आहे. गाणी अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी लिहिली असून संगीत देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांचं आहे. पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे आहेत.
लोकल प्रवासात फुललेलं प्रेम मोठ्या पडद्यावर
मुंबई लोकल हे केवळ एक प्रवासाचे साधन नाही, तर अनेक मुंबईकरांचं कुटुंब आहे. इथेच मैत्री फुलते, संवाद होतात, आणि कधी प्रेमही उगम पावते. अशीच एक अनोखी प्रेमकहाणी मुंबई लोकल या चित्रपटातून पाहता येणार आहे. जरी मराठी चित्रपटांतून याआधीही लोकल दाखवली गेली असली, तरी प्रेमकहाणीच्या केंद्रस्थानी लोकल असलेला हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.
प्रेक्षकांसाठी खास भेट
टाइमपास, टकाटक, बालक पालक सारख्या लोकप्रिय चित्रपटांतून लक्षवेधी ठरलेला प्रथमेश परब आणि सख्या रे, ठिपक्यांची रांगोळीसारख्या मालिका व धुरळासारख्या चित्रपटात झळकलेली ज्ञानदा रामतीर्थकर यांची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर नव्या रूपात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा हा अनोखा अनुभव मोठ्या पडद्यावर १ ऑगस्टपासून आवर्जून घ्यावा लागेल.
