‘जारण’च्या यशाचा जल्लोष – भव्य सक्सेस पार्टीने साजरी केली घवघवीत कामगिरी

तीन आठवड्यांत सहा कोटींचा टप्पा पार करत रसिकांची मनं जिंकली

‘जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत प्रेक्षक, समीक्षक, आणि चित्रपटसृष्टीतील जाणकार मंडळींचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमाने आपल्या भावनिक आशयाने केवळ मराठी चित्रपटगृहातच नव्हे, तर हिंदी सिनेमांच्या स्पर्धेतही आपलं वेगळेपण सिद्ध केलं. तीन आठवड्यांतील सुमारे ६ कोटी रुपयांची कमाई हा केवळ आकडा नसून, रसिकांच्या प्रेमाचं आणि कथेच्या सच्चेपणाचं प्रतिक ठरला आहे.

‘जारण’च्या शोमध्ये वाढ, यशस्वी प्रवासासाठी टीमचं कौतुक

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोज महाराष्ट्रभर वाढवण्यात आले आहेत. याच यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, आणि मान्यवर पाहुण्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांची भावना – प्रकल्प नव्हे, भावनिक बंध

यावेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणाले, “‘जारण’ हे केवळ एक प्रोजेक्ट नव्हे, तर एक स्वप्न होतं. ते जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब त्यात उमटतं, तेव्हा निर्मितीचा खरा अर्थ समजतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आहे.”

निर्माते अमोल भगत – यश ही प्रेक्षकांची पोचपावती

अमोल भगत यांनी यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले, “‘जारण’सारखा विचारप्रधान चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं समाधान खूप मोठं आहे. हे यश म्हणजे आमच्यावर प्रेक्षकांचा असलेला विश्वास आणि आमच्या टीमच्या परिश्रमांची पावती आहे.

अमृता सुभाष–अनिता दाते यांच्या अभिनयाला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने, आणि एथ्री इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. निर्मिती अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांची असून मनन दानिया सहनिर्माते आहेत.

चित्रपटात अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्यासह किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, आणि सीमा देशमुख यांचा प्रभावी अभिनय पाहायला मिळतो — ज्यामुळे ‘जारण’चा अनुभव अधिक गहिरा होतो.

Leave a comment