
‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन — थेट वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद
प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि आशयसंपन्न मालिका देणाऱ्या झी मराठी वाहिनीवर आता ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खेड्यातून उगम पावलेली, शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तिचं स्वप्न केवळ स्वतःच्या यशापुरतं मर्यादित नसून, शिक्षणाच्या माध्यमातून इतर मुलींसाठी संधीचं दार उघडण्याचं आहे — स्वतःच्या गावात महाविद्यालय सुरु करण्याचं स्वप्न ती उराशी बाळगते.
या मालिकेच्या प्रमोशनसाठी झालेल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट, गोखले रोड नौपाडा, ठाणे येथील पटांगणात ३००० हून अधिक शाळकरी मुला-मुलींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती सादर केली. या अनोख्या अभिवादनाने वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये स्थान मिळवून मालिकेच्या नावावर एक अभिमानास्पद नोंद झाली.

या भव्य कार्यक्रमात ‘कमळी’ची भूमिका साकारणारी विजया बाबर, अभिनेत्री केतकी कुलकर्णी आणि अभिनेता निखिल दामले हे प्रमुख कलाकार उपस्थित होते. शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात कलाकारांनी मालिकेबद्दल अनुभव शेअर करताना ‘कमळी’चा आशय आणि भावनिक प्रवास उलगडून सांगितला.

या ऐतिहासिक क्षणाने मालिकेच्या कथेला एक नवसंजीवनी मिळाली असून, ‘कमळी’ ही मालिका केवळ एका मुलीची कहाणी न राहता — शिक्षण, स्वप्न, आणि आत्मभानाचा मोठा संदेश घेऊन घराघरात पोहोचण्याच्या तयारीत आहे.
तेव्हा बघायला विसरू नका — ‘कमळी’ ३० जूनपासून दररोज रात्री ९ वा., केवळ आपल्या झी मराठीवर.
